Dhananjay Munde : मराठा आरक्षणासाठी आक्रमक आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. बीडचे माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नावाने त्यांनी थेट जीवावर बेतणारा आरोप करत राजकारणाचे वातावरण ढवळून काढले. जरांगे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्या हत्येचा कट धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून रचण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर या कटासाठी तब्बल अडीच कोटींची डील झाल्याचाही त्यांनी दावा केला.
या गंभीर आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी परळी (Parli) येथील जगमित्र कार्यालयातून पत्रकार परिषद घेत या सर्व दाव्यांना ठामपणे नाकारले. त्यांनी स्पष्ट केलं की, “मी गेली ३० वर्षे समाजकारण आणि राजकारणात आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि माझ्या अण्णांनी कधीही जातपात बघून काम केले नाही. मीही आजवर कधीच जात बघून निर्णय घेतले नाहीत.”
धनंजय मुंडेंनी पुढे सांगितले की, “मी विरोधी पक्षनेते म्हणून पाच वर्षे काम केले. त्यावेळी मराठा आरक्षणाचा विषय सभागृहात मांडला आणि तोडगा निघेपर्यंत सभागृह चालवले नाही. कोपर्डी (Kopardi) येथील अत्याचार प्रकरणात मी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचलो. आरोपीला अटक होईपर्यंत मी सभागृह सुरू होऊ दिले नाही. बीड जिल्ह्यात ८० हजार लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून दिलं.”
तसेच त्यांनी स्पष्ट केले की, “मनोज जरांगे यांच्या उपोषणाला मी भेट दिली होती. १७ तारखेला झालेल्या सभेनंतरही मी त्यांच्यावर कधीच वैयक्तिक आरोप केले नाहीत. पण आता जरांगेना वाटतं की धनंजय मुंडे या पृथ्वीतलावर नसावेत, हे खेदजनक आहे.”
मुंडेंनी पुढे सांगितले की, “माझ्या जीवावरही प्रयत्न झाले आहेत. मला तलवार घेऊन मारायला आले होते. पण तरीही आम्ही शांत राहिलो. सध्या ‘ईडब्ल्यूएस की ओबीसी’ असा वाद निर्माण केला जातोय. हाके, वाघमारे यांच्यावर झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी कोण घेणार? आम्ही फक्त एवढंच म्हणतो की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये. माझ्याविरुद्ध खोटी इमेज तयार केली जात आहे.”
या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडून व्हावा, अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली. त्यांनी ठामपणे सांगितले की, “माझं ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करा आणि मनोज जरांगे तसेच आरोपींचीही करा. सत्य बाहेर आलं पाहिजे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाही कोणाशी बोलताना अशा भाषेचा वापर अपेक्षित नाही. आज एआयच्या युगात काहीही बनवता येतं, पण माझा फोन कायम सुरू असतो, कारण लोकांच्या अडचणी सोडवणे हेच माझं काम आहे.”
धनंजय मुंडेंनी यावेळी असेही सांगितले की, “मनोज जरांगे, हे सगळं तुम्हाला महागात पडेल. आज मराठा आरक्षणाच्या आंदोलनात ५०० लोकांनी जीव दिला. जर ईडब्ल्यूएसमधून मार्ग काढला असता, तर हे टळलं असतं. पण आता समाजात पुन्हा फूट पडू देऊ नका.”