Sharad Pawar NCP : एक वर्षात दुसऱ्यांदा पक्षांतर! शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, पुणे ग्रामीणचा बडा नेता शिंदे गटात

Sharad Pawar NCP : नगर परिषद आणि नगर पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar Group) ला पुणे ग्रामीण भागात मोठा धक्का बसला आहे. खेड तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचा प्रभाव असलेले अतुल देशमुख (Atul Deshmukh) यांनी पुन्हा एकदा पक्षांतराचा निर्णय घेतला आहे.

खेड तालुक्याच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावणारे माजी जिल्हा परिषद सदस्य देशमुख हे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena) प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या एका वर्षापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षातून (Bharatiya Janata Party) बाहेर पडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (Sharad Pawar’s NCP) प्रवेश केला होता.

मात्र, आता त्यांनी पुन्हा एकदा नवा राजकीय मार्ग निवडला आहे. हा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतल्याने खेड तालुक्यातील स्थानिक राजकारणात नवीन समीकरणं तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशमुख हे तालुक्यातील ताकदवान आणि जनसंपर्क असलेले नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या या हालचालीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी नाकारल्याने देशमुख नाराज होते. त्यातच स्थानिक पातळीवर वाढलेले अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील दुफळीमुळे त्यांनी अखेर शरद पवार गट सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

देशमुख यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेला खेड तालुक्यात मोठा आधार मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाला यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. येत्या निवडणुकांमध्ये या पक्षांतराचा परिणाम तालुक्याच्या शक्तिसमीकरणावर कसा होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अतुल देशमुख हे खेड तालुक्यातील प्रभावशाली नेते असून, त्यांचा स्थानिक पातळीवरील मजबूत जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगला प्रभाव आहे. परंतु, फक्त एका वर्षात दुसऱ्यांदा पक्ष बदलल्यामुळे त्यांचा हा निर्णय राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.