Narendra Modi : कृषी क्षेत्रातील स्वावलंबन वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज तब्बल 35 हजार 440 कोटी रुपयांच्या दोन नव्या योजना सुरू केल्या. समाजवादी नेते जयप्रकाश नारायण (Jayaprakash Narayan) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात या योजनांचा शुभारंभ झाला. यामध्ये देशाच्या डाळी उत्पादनातील आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा मोठा उद्देश आहे.
पहिली योजना म्हणजे ‘डाळी स्वावलंबन अभियान’ (Pulses Self-Reliance Campaign). या योजनेसाठी केंद्र सरकारने 11,440 कोटी रुपये मंजूर केले आहेत. उद्दिष्ट आहे. 2030-31 पर्यंत डाळीचे उत्पादन 252.38 लाख टनांवरून 350 लाख टनांपर्यंत वाढवणे, तसेच देशाचे परदेशी आयातीवरील अवलंबित्व संपवणे.
दुसरी योजना म्हणजे ‘पंतप्रधान धन धन कृषी योजना’ (PM Dhan Dhan Krishi Yojana), ज्यावर तब्बल 24 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या योजनेचा हेतू आहे. शाश्वत शेतीला चालना देणे, पीक विविधीकरणाला प्रोत्साहन देणे आणि पंचायत व ब्लॉक पातळीवर साठवणूक व सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे. ही योजना 100 निवडक जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे.
पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात 5,450 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील प्रकल्प सुरू केले, तसेच 815 कोटी रुपयांच्या नव्या प्रकल्पांची पायाभरणी केली. उद्घाटन झालेल्या प्रमुख प्रकल्पांमध्ये बंगळुरू (Bengaluru) आणि जम्मू आणि काश्मीर (Jammu & Kashmir) येथील कृत्रिम रेतन प्रशिक्षण केंद्रे, आसाम (Assam) मधील राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत आयव्हीएफ प्रयोगशाळा, मेहसाणा (Mehsana), इंदूर (Indore) आणि भिलवाडा (Bhilwara) येथील दूध पावडर प्लांट, तसेच तेजपूर (Tezpur) येथे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत माशांच्या खाद्य प्लांटचा समावेश आहे.
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (National Natural Farming Mission), मैत्री तंत्रज्ञ (Maitri Technicians) आणि प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था (PACS) अंतर्गत प्रमाणित झालेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्रे प्रदान केली. हे केंद्र प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे (PMKSKs) आणि सामान्य सेवा केंद्रे (CSCs) मध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमात 10,000 शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) अंतर्गत 50 लाख शेतकरी सदस्यांचा सहभाग होता. शेतकऱ्यांशी संवाद साधताना मोदींनी डाळी उत्पादन वाढवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमात कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan), मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह (Rajeev Ranjan Singh) आणि कृषी राज्यमंत्री भागीरथ चौधरी (Bhagirath Choudhary) उपस्थित होते.