Jaykumar Gore : सांगोला (Sangola) विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) पराभूत झाले होते. मात्र आता या पराभवाच्या मागे भाजपचा (BJP) हात होता का, असा नवा सवाल उपस्थित झाला आहे. कारण ठरलं ते म्हणजे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या एका जाहीर वक्तव्याचं. या वक्तव्यामुळे सांगोला परिसरातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे.
अलीकडेच सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाचे (Shetkari Kamgar Paksha) आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr. Babasaheb Deshmukh) यांच्या काही समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश थांबवण्याचा प्रयत्न स्वतः देशमुख यांनी केला, असं अनेक प्रवेशकर्त्यांनी स्पष्ट सांगितलं. या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी भाषणात उल्लेख करत म्हटलं, “काही लोक म्हणतात मी किती दिवस पालकमंत्री असेल. पण तुम्हाला आमदार करताना मी पालकमंत्री नव्हतो,” असं म्हणत त्यांनी देशमुख यांना आठवण करून दिली की, त्यांना आमदार बनवण्यात स्वतःचा सहभाग होता.
या भाषणात गोरे यांनी स्पष्ट केलं, “2029 च्या विधानसभा निवडणुकीत सांगोल्याचा आमदार हा भाजपचाच असेल.” या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली की, मागील निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांच्या पराभवात भाजपनेच भूमिका बजावली का? कारण त्यांच्या या वक्तव्याने अप्रत्यक्षरीत्या तशी कबुली दिल्यासारखं वाटतंय.
यावर प्रतिक्रिया देताना माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मात्र अत्यंत शांत भूमिका घेतली. “निवडणुकीत मला भाजपने मदतच केली. कदाचित पालकमंत्री जयकुमार गोरे हे भावनेच्या भरात काही बोलले असतील,” असं म्हणत त्यांनी संपूर्ण वादाला वळण देण्याचा प्रयत्न केला. तसेच “माझा पराभव हा माझ्या आजारपणामुळे झाला. पण पुढच्या निवडणुकीत सांगोल्यातून पुन्हा शिवसेनेचाच आमदार होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शहाजीबापू पाटील यांनी पुढे ठामपणे सांगितलं, “2029 च्या निवडणुकीत सांगोला मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडेच राहील. जनतेचा विश्वास आजही आमच्यावर आहे.” त्यांनी जयकुमार गोरेंच्या वक्तव्याला नाकारत सांगितलं की, शिवसेना सांगोल्यात मजबूत आहे आणि राहणारच
सांगोला विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत झाली होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शहाजीबापू पाटील मैदानात उतरले होते, शेतकरी कामगार पक्षाकडून डॉ. बाबासाहेब देशमुख लढले होते आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना पक्षाकडून दीपकआबा पाटील (Deepakaba Patil) उमेदवार होते. निकालात शेकापच्या डॉ. देशमुख यांनी 1,16,256 मते मिळवत विजय मिळवला, शहाजीबापू पाटील यांना 90,278 मते मिळाली, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे दीपकआबा पाटील यांना 50,962 मते मिळाली होती.
जयकुमार गोरेंच्या या वक्तव्यामुळे सांगोला राजकारणात पुन्हा नवी समीकरणं तयार होण्याची चर्चा रंगली आहे. एका वक्तव्यामुळे भाजप, शिवसेना आणि शेकाप या तीन पक्षांतील अंतर्गत मतभेद उघडकीस आल्याचं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे.