Share

Nobel Prize | “ओबामांना काहीच न करता शांततेचा नोबेल दिला, मी 8 युद्ध थांबवली, पुरस्कार मलाच द्या असं नाही, पण…; डोनाल्ड ट्रंप यांची वेगळीच मागणी

Nobel Prize :  नॉर्वेतील (Norway) ओस्लो (Oslo) येथे आज नोबेल पुरस्कारांची घोषणा होणार असून, यंदा एकूण ३३८ नामांकनं आली आहेत. यामध्ये २४४ व्यक्ती आणि ९४ संस्था आहेत. नोबेल पुरस्कार (Nobel Prize) हे दरवर्षी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिले जातात.

नोबेल पुरस्कारांची सुरुवात कधी झाली?

नोबेल पुरस्कारांची परंपरा १९०१ साली सुरू झाली. हे पुरस्कार स्वीडिश संशोधक आणि उद्योगपती अल्फ्रेड नोबेल (Alfred Nobel) यांच्या नावाने दिले जातात. डायनामाइटचा शोध लावून जगभरात ओळख निर्माण केलेल्या नोबेल यांनी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा मानवतेसाठी या पुरस्कारांच्या स्वरूपात ठेवला.

ट्रम्प यांचा स्वतःबद्दलचा दावा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे नाव यंदा नोबेल शांतता पुरस्कारासाठी चर्चेत होते. व्हाईट हाऊस (White House) मध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी स्वतःच्या कामगिरीचा उल्लेख करत म्हटलं, “मी आठ युद्धं थांबवली आहेत (8 Wars Ended). मी अनेक जीव वाचवले, परंतु हे मी पुरस्कारासाठी नाही केलं.”

ट्रम्प यांनी पुढे सांगितलं, “बराक ओबामा यांनी काहीच केलं नाही, तरी त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. मी इस्रायल (Israel), आर्मेनिया (Armenia), कंबोडिया (Cambodia), अझरबैजान (Azerbaijan) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्या मदतीने अनेक संघर्ष शांततेत बदलले, तरी माझ्या कामाचं कौतुक केलं जात नाही.”

ओबामांवर थेट टीका

२००९ साली अध्यक्षपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर अवघ्या आठ महिन्यांत ओबामांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला होता. यावर ट्रम्प यांनी उपहासात्मक भाष्य करत म्हटलं, “ओबामांना काहीही माहिती नव्हती, त्यांनी काहीही केलं नाही, तरी पुरस्कार मिळाला. उलट त्यांच्या काळात देशाचं नुकसानच झालं.”

इतिहासात अनेक वेळा नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आलेला नाही. १९ वेळा हा पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला गेला. कारण  युद्धस्थिती किंवा योग्य उमेदवार न सापडणे. नोबेल फाऊंडेशनच्या नियमांनुसार, जर कोणत्याही उमेदवाराचे कार्य पुरेसे महत्त्वपूर्ण नसल्याचं ठरवलं, तर पुरस्कार पुढील वर्षी देण्याची तरतूद आहे. तरीही जर योग्य उमेदवार सापडला नाही, तर ती रक्कम फाऊंडेशनच्या निधीत जमा केली जाते.

 

 

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now