Share

Sharad Pawar : समाजा-समाजातील आजची दुही, विसंवाद अन् संघर्ष, या पापाचे धनी शरद पवार; राधाकृष्ण विखे पाटलांचा थेट आरोप

 Sharad Pawar : समाजात आज निर्माण झालेली दुही, विसंवाद आणि संघर्षाची स्थिती ही काही योगायोगाने नव्हे, तर यामागे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचं पाप दडलेलं आहे, अशी थेट टीका राज्याचे मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली. ते बुलढाणा दौऱ्यावर बोलत होते.

विखे पाटील म्हणाले की, “सन 1994 मध्ये जर शरद पवार यांनी मराठा समाजाचा समावेश आरक्षणात केला असता, तर आजची ही परिस्थिती उद्भवली नसती. समाजा-समाजात फूट पाडण्याचं पाप त्याच काळात झालं आणि त्याचे परिणाम आज आपण भोगतो आहोत.”

सध्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि ओबीसी आरक्षण (OBC Reservation) या दोन्ही प्रश्नांवरून वाद निर्माण झाला आहे. ओबीसी समाज आक्रमक झाला असून, त्यांनी सरकारच्या 2 सप्टेंबरच्या जीआरला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिलासा देत स्थगिती नाकारली. त्यानंतर ओबीसी नेत्यांनी सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली.

या पार्श्वभूमीवर बोलताना विखे पाटील म्हणाले, “हैदराबाद गॅझेटिअरनुसार ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण मी ओबीसी समाजाला विचारतो. जेव्हा तुम्हाला आरक्षण मिळालं, तेव्हा मराठ्यांनी विरोध केला होता का? नाही ना! मग आता का विरोध?”

त्यांनी पुढे थेट शरद पवारांवर टीका करत म्हटलं, “1994 मध्ये जेव्हा पवार मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनीच समाजात दुही पेरण्याचं काम केलं. आज ओबीसी आणि मराठा समाजामध्ये निर्माण झालेली फूट, हाच त्या काळातील चुकीच्या निर्णयाचा परिणाम आहे. त्यामुळे या पापाचे धनी शरद पवारच आहेत.”

दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील टीकेबद्दल विचारलं असता विखे पाटील म्हणाले, “संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. ते फक्त बांग देणारा कोंबडा आहेत. त्यांचा सामना (Saamana) पेपर फार कमी लोक वाचतात. त्यामुळे ते काय लिहितात याला काही महत्त्व नाही. सरकारने शेतकऱ्यांना पुरेसं पॅकेज दिलं आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

सचिन घायवळ (Sachin Ghaywal) प्रकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “हा माणूस कोण आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. पोलिसांनी त्याची शिफारस केली किंवा नाही, यावर गृहराज्यमंत्री आधीच खुलासा देऊन गेले आहेत. विरोधकांचं काम फक्त एकच — काहीही घडलं की राजीनामा मागायचा!” असं विखे पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now