Pune New : पुणे जिल्ह्यातील चाकण (Chakan) परिसर नेहमीप्रमाणे आजही चर्चेत आहे, पण यावेळी कारण वेगळं आहे. नेहमी वाहतूक कोंडीनं त्रस्त असलेले नागरिक आणि कर्मचारी यांनी आज रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात आवाज उठवला. “आज पोलिसांनी मोर्चाच्या भीतीने चोख बंदोबस्त लावला, त्यामुळे सगळी वाहतूक सुरळीत आहे. मग हा शिस्तबद्ध कारभार रोज का होत नाही?” असा संतप्त प्रश्न चाकणकरांनी उपस्थित केला आहे.
दररोज होणाऱ्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीला (Chakan Traffic Jam) कंटाळून “वाहतूक कोंडी मुक्त चाकण कृती समिती”ने आज मोठा मोर्चा काढला. या मोर्चासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) संपूर्ण बंदोबस्त उभारला. परिणामी आज रस्त्यांवर एकही अडथळा नव्हता. पण नेहमीच्या दिवसांत अशीच काटेकोर व्यवस्था का केली जात नाही, असा सवाल जनतेकडून होत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ८ ऑगस्ट रोजी चाकणचा दौरा करून वाहतूक समस्येची पाहणी केली होती. त्यादिवशी सकाळपासूनच वाहतूक ठप्प झाली होती. स्वतः अजितदादांनी त्या कोंडीवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर दोन महिन्यांत प्रशासनाकडून केवळ दिखाव्यापुरतीच पावलं उचलली गेल्याचं चित्र आहे.
वाहतूक कोंडीनं हैराण झालेल्या नागरिकांनी आजच्या मोर्चातून प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला. “अजित पवारांच्या समोर प्रशासनाने दाखवलेली सुधारणा ही फक्त एक नाटक होती. दादांच्या डोळ्यावरची दिखाव्याची पट्टी हटवण्यासाठी हा मोर्चा आहे,” असं कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं.
हा मोर्चा चाकण ते आकुर्डी (Chakan to Akurdi) पीएमआरडीए कार्यालयापर्यंत निघाला असून सुमारे २५ किलोमीटर अंतर पायी पार केलं जात आहे. या मोर्चात खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि आमदार बाबाजी काळे (Babaji Kale) यांच्या सहभागाची अपेक्षा आहे.
दररोजच्या या मार्गावर लाखो वाहनांची वर्दळ असते. पुणे-नाशिक महामार्ग (Pune-Nashik Highway), चाकण-शिक्रापूर मार्ग (Chakan-Shikrapur Road) आणि औद्योगिक एमआयडीसी (MIDC) परिसरातील अवजड वाहतूक यामुळे चाकणची रस्त्यावरील परिस्थिती बिकट झाली आहे. या मार्गावर १५०० हून अधिक उद्योग आहेत, आणि साडेतीन लाखांहून अधिक कर्मचारी दररोज प्रवास करतात. एवढ्या प्रमाणात वाहतूक असूनही नियोजनाचा पूर्ण अभाव दिसतो.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज दाखवलेलं नियोजन कौतुकास्पद असलं तरी, चाकणकरांचा सवाल मात्र ठाम आहे. “जर पोलिस आणि प्रशासनाला हे एकदाच शक्य आहे, तर रोज का नाही?”