Share

Beed Airport: आनंदाची बातमी, बीडमध्ये रेल्वेपाठोपाठ विमानही लँड होणार, नेमकं कुठे असणार एअरपोर्ट?

Beed Airport:  बीडच्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. गेल्या काही वर्षांपासून रेल्वेच्या आगमनाची अपेक्षा असलेला बीड आता हवाई मार्गानेही जोडला जाणार आहे. प्रशासनाने कामखेडा (Kamkheda) परिसरात प्रस्तावित विमानतळासाठी जागा निश्चित केली असून, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MADC) यांच्या अधिकारी यांनी प्रकल्पाची सखोल पाहणी केली. प्राथमिक चर्चेतून हा निष्कर्ष निघाला की, कामखेडा परिसर हा बीड विमानतळ प्रकल्पासाठी अत्यंत योग्य आहे.

अधिकार्‍यांच्या मते, या परिसरात राज्य सरकारकडे 200 हेक्टराहून अधिक जमीन उपलब्ध आहे. जमिनीचा उतार, भौगोलिक स्थिती आणि परिसराची सुसंगतता या सर्व बाबी विमानतळ उभारणीस अनुकूल आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे 170 हेक्टर जमीन आवश्यक असून, त्यापैकी 80 हेक्टर आधीच सरकारकडे आहे. उर्वरित जमिनीचा भूसंपादनाद्वारे विचार केला जाईल. प्रशासनाने आता प्रकल्पाची डिझाईनिंग, बांधकाम आणि भूसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

बीड विमानतळ पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील नव्या विमानतळांपैकी हे एक महत्वाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. प्रकल्पामुळे नागरिकांसाठी सुविधा, रोजगार आणि आर्थिक प्रगतीसाठी नवे दालन उघडले जाणार आहेत. शहराचे महत्त्व देशाच्या हवाई नकाशावर वाढेल, असे अधिकारी सांगतात.

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन (Vivek Johnson) यांनी कामखेडा परिसराची तपासणी करून आवश्यक पायाभूत सुविधा आणि सुरक्षा निकषांवर चर्चा केली. प्रकल्प सुरू झाल्यानंतर बीडचा थेट संपर्क मुंबई (Mumbai), पुणे (Pune) आणि इतर मोठ्या शहरांशी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि पर्यटन, उद्योगक्षेत्राला चालना मिळेल. स्थानिक व्यापारी, उद्योगपती आणि नागरिकांनी या प्रकल्पाचे स्वागत केले आहे.

काही दिवसांपूर्वी बीडमध्ये रेल्वे धावली. मराठवाड्यातील बीड (Beed) जिल्हा या मार्गापासून वंचित होता. गेल्या तीन पिढ्यांपासून बीडकरांनी रेल्वेचे इंजिन धावावे, शिट्टी वाजावी आणि बीडमध्ये रेल्वे येईल, अशी अपेक्षा केली होती. आता रेल्वेसह एसटी आणि विमानसेवा सुरु होणार असल्याने नागरिकांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now