Gautami Patil Pune Accident : पुणे (Pune) शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातानंतर चर्चेत आलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिला अखेर पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठा दिलासा दिला आहे. नवले उड्डाणपुलाजवळ (Navale Flyover Area) झालेल्या या अपघाताच्या तपासात ती गाडीत उपस्थित नव्हती, हे स्पष्ट झालं असून तिला पोलिसांकडून क्लीन चिट देण्यात आली आहे.
तपासातून उघड झाले धक्कादायक तथ्य
३० सप्टेंबरच्या पहाटे गौतमी पाटीलच्या नावावर असलेल्या कारने एका रिक्षाला जोरदार धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे (Samaji Vitthal Margale) गंभीर जखमी झाला होता. घटनेनंतर मरगळे यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या देत, गौतमीवर कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यांचा आरोप होता की, ती सेलिब्रिटी असल्याने पोलिसांकडून तपासात चालढकल केली जात आहे.
या प्रकरणाची तीव्रता वाढल्यानंतर कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी स्वतः पोलिसांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे हे प्रकरण राजकीय रंग घेत मोठ्या प्रमाणात गाजले.
पोलिसांचा तपास आणि सीसीटीव्ही पडताळणी
अपघाताच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी सखोल तपास करत तब्बल १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्या फुटेजमध्ये अपघाताच्या वेळी फक्त चालकच गाडीत असल्याचे दिसून आले. त्यानंतरच तपास अधिकाऱ्यांनी गौतमी पाटील गाडीत नव्हती, हे निश्चित केलं. तपास अहवालाच्या आधारे पोलिसांनी तिला क्लीन चिट दिली.
रिक्षाचालक कुटुंबीयांचे प्रश्न कायम
रिक्षाचालक मरगळे यांच्या कुटुंबीयांनी मात्र अद्याप अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघातानंतर अर्ध्या तासाने टोईंग व्हॅन घेऊन एक व्यक्ती घटनास्थळी आला आणि कार उचलून नेली, असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अपघातानंतर कोणालातरी अचानक ड्रायव्हर म्हणून सादर करण्यात आलं. तसेच, हायवेवरील कॅमेरे बंद होते, हे पोलिसांनी सांगितल्याने त्यांचं संशय अधिकच वाढला आहे.
या अपघात प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. त्याने सर्व पुरावे, साक्षी आणि फुटेज तपासल्यानंतर गौतमी पाटीलला निर्दोष ठरवलं. त्यामुळे या प्रकरणातील चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.