Share

Cough Syrup News : मेडिकल स्टोअर्समध्ये ‘ते’ विषारी औषध दिसल्यास त्वरित कळवा, राज्य सरकारचं महत्त्वाचं आवाहन

Cough Syrup News : देशभरात बालकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ‘कोल्ड्रिफ कफ सिरप’ (Coldrif Cough Syrup) प्रकरणानं आरोग्यव्यवस्थेत खळबळ उडवली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) मोठी कारवाई करत राज्यभर सतर्कतेचा इशारा दिला आहे. अन्न आणि औषध प्रशासन (FDA Maharashtra) विभागानं याबाबत विशेष टोल-फ्री क्रमांक जाहीर केला असून, औषध विक्रेते व नागरिकांना हे विषारी औषध कुठं आढळल्यास तात्काळ कळवण्याचं आवाहन केलं आहे.

‘कोल्ड्रिफ’ सिरपमध्ये सापडला विषारी घटक

या खोकल्याच्या औषधात डायथिलीन ग्लायकोल (Diethylene Glycol) नावाचा अतिशय विषारी रासायनिक घटक असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालानुसार, या सिरपच्या SR-13 बॅचमध्ये तब्बल 48.6% डायथिलीन ग्लायकोल आढळलं. जे केवळ 0.1% पर्यंतच सुरक्षित मानलं जातं. या रासायनिक घटकामुळे मुलांच्या मूत्रपिंडाचं कार्य बंद पडतं आणि गंभीर स्थितीत मृत्यूही होऊ शकतो.

मध्य प्रदेशात 14, राजस्थानात 3 बालकांचे मृत्यू

या सिरपमुळे मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) छिंदवाडा (Chhindwara) जिल्ह्यात तब्बल 14 लहान मुलांचा आणि राजस्थानात (Rajasthan) आणखी 3 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्वच मुलांनी एकाच प्रकारचं सिरप घेतल्याचं तपासात आढळलं आहे. या घटनेनंतर मध्य प्रदेश पोलिसांनी (MP Police) सिरप उत्पादक कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून एक डॉक्टरलाही अटक केली आहे.

केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश

या धक्कादायक घटनांनंतर केंद्र सरकारने (Central Government of India) सर्व राज्यांना उच्च सतर्कतेचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार तमिळनाडू (Tamil Nadu), केरळ (Kerala) आणि मध्य प्रदेश या राज्यांनी तत्काळ निर्णय घेत ‘कोल्ड्रिफ कफ सिरप’च्या विक्रीवर बंदी घातली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही या औषधाचा एकही साठा राहू नये म्हणून औषध प्रशासन विभागाने मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम सुरू केली आहे.

नागपूरमध्ये अलर्ट

नागपूर (Nagpur City) परिसरात संशयित औषधाचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत (NIV Pune) पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, विदर्भ आणि मध्य प्रदेशातील काही भागात ए.ई.एस. (Acute Encephalitis Syndrome) आणि जपानी एन्सेफेलायटिस (Japanese Encephalitis) या आजारांच्या संशयित रुग्णांमुळे गोंधळ उडाला आहे. मात्र, प्रयोगशाळेतील प्राथमिक अहवालात हे दोन्ही आजार नकारार्थी आढळले असल्याने मुलांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय, याबद्दल अजूनही गूढ कायम आहे.

राज्य सरकारचा नागरिकांना इशारा

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभागानं सर्व मेडिकल स्टोअर मालकांना सूचित केलं आहे की, मे 2025 ते एप्रिल 2027 दरम्यान तयार झालेलं ‘कोल्ड्रिफ कफ सिरप’ दुकानात आढळल्यास तात्काळ टोल-फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. तसेच विक्री, वितरण किंवा वापर पूर्णपणे थांबवावा, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

छिंदवाड्यातील या घटनेनंतर बालऔषधांच्या गुणवत्ता तपासणीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून उत्पादन प्रक्रियेवरील नियंत्रण वाढवण्याची आवश्यकता स्पष्ट झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, “औषध निर्मितीतील निष्काळजीपणा थांबवला नाही, तर अशा घटना पुन्हा होऊ शकतात.”

ताज्या बातम्या आरोग्य

Join WhatsApp

Join Now