Bapu Pathare : पुणे शहराजवळील लोहगाव (Lohgaon, Pune) परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे (Bapu Pathare, NCP Sharad Pawar) यांच्यासोबत झालेल्या धक्काबुक्कीची घटना चर्चेत आली आहे. ही धक्काबुक्की अजित पवार गटातील नेते बंडू खांदवे (Bandu Khandve, Ajit Pawar NCP) यांच्यासोबत झालेल्या वादानंतर घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.
लोहगाव पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या घटनेमुळे लोहगाव भागात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.
कार्यक्रमात वाद, त्यानंतर धक्काबुक्की
लोहगाव भागातील एका सेवानिवृत्त सैनिकाच्या सन्मानासाठी आयोजित कार्यक्रमात बापू पठारे आणि बंडू खांदवे हे दोघेही उपस्थित होते. त्यावेळी काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा चिघळला की पठारे यांच्या दिशेने काही कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. त्यात त्यांच्या गाडीच्या चालकाला देखील मारहाण झाल्याचे सांगण्यात आले आहे.
समर्थक आमनेसामने
वादानंतर खांदवे यांच्या समर्थकांनी पठारे यांना घेराव घातला, तर पठारे यांच्या समर्थकांनीही संताप व्यक्त केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, दोन्ही गटांना वेगळं केलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या दरम्यान लोहगाव भागात काही काळ तणावाचं वातावरण पसरलं होतं.
बंडू खांदवे यांचा प्रभाव
बंडू खांदवे हे हवेली पंचायत समितीचे माजी सभापती असून, त्यांचा लोहगाव परिसरात मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या आणि पठारे यांच्या वादानंतर स्थानिक राजकीय गटांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाल्याने चर्चेला अधिक जोर मिळाला आहे.
कोण आहेत बापू पठारे?
बापू पठारे हे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वडगाव शेरी (Wadgaon Sheri) विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. त्यांनी गेल्या निवडणुकीत सुनील टिंगरे यांचा पराभव करून विजय मिळवला होता. पुणे जिल्ह्यात शरद पवार यांच्या पक्षाचे ते एकमेव आमदार आहेत आणि त्यांचा स्थानिक स्तरावर प्रभाव मानला जातो.