Ramdas Kadam Vs Anil Parab : शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी अनिल परब (Anil Parab) यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. कदमांनी स्पष्ट केले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या मृतदेहावर दोन दिवस घरीच ठेवण्यास परवानगी दिली, आणि त्यांच्या हाताचे ठसे घेण्याचा आरोप कायम आहे. “यावर उद्धव ठाकरे का बोलत नाहीत? त्यांच्या चेलेचपाटे का बोलतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “अनिल परबांना ‘मातोश्री’चा हिस्सा मिळाला आहे का?” असा गंभीर प्रश्नही रामदास कदम यांनी विचारला.
कदमांनी सांगितले की, बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना नाईलाजाने मंत्रिपद दिले, परंतु 2014 नंतर कोणत्याही मेळाव्यात बोलू दिले नाही.
अनिल परब अर्धवट वकील
रामदास कदम म्हणाले, “मला वाटतं अनिल परब हे अर्धवट वकील आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला अडाणीपणा दाखवला. मी ज्या डॉक्टरांचा उल्लेख केला होता, त्यांच्यावर त्यांनी दावा करणार का? मी आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी करणार आहे. तसे पत्र मी मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे.”
कदमांनी अनिल परबांना टोला मारत सांगितले की, “मी 50 वर्ष मातोश्रीवर काढली, या प्रकरणी स्वतः उद्धव ठाकरे बोलावेत, चेलेचपाटे बोलू नयेत.” चंद्रग्रहणाच्या रात्री वरळी (Varli) येथील स्मशानभूमीत बकरा का कापला, दोन नंगे बाबा होते, असा प्रश्न त्यांनी अनिल परबांना केला.
पत्नी वाचवल्याचा दावा
रामदास कदम यांच्या पत्नीने स्वतःला जाळण्याचा प्रयत्न केला, असे अनिल परब यांनी आरोप केले होते. या संदर्भात कदम म्हणाले, “माझी पत्नी खेडला स्वयंपाक करत होती. त्या वेळी दोन स्टोव्हा भडकले आणि साडीला आग लागली. माझ्या पत्नीला मीच वाचवलं. हा खोटं सांगत आहे, यासाठी मी 100 टक्के न्यायालयात जाईन. आमच्या कुटुंबात कोणीही आत्महत्या केली नाही.”
सावली बार प्रकरण
सावली बारच्या आरोपांवर बोलताना कदम म्हणाले, “तो बार नव्हता, तो ऑर्केस्ट्रा होता. आम्हाला मानहानी करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या ठिकाणी काम करणारी मुलगी विक्षिप्त वागणूक करत होती, म्हणून आम्ही तो बंद केला.”
अनिल परबांचे आरोप
अनिल परब यांनी रामदास कदमांवर अनेक आरोप केले आहेत. त्यांनी मागणी केली की, उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा, तसेच रामदास कदमांची पत्नी 1993 मध्ये स्वतःला जाळून घेतली का, याची चौकशी करा. बाळासाहेब ठाकरे यांचे मृत्यूपत्र आपल्याकडे आहे, आपण ट्रस्टी आहोत, त्यामुळे कोर्टात जावे, असे आव्हान त्यांनी दिले. तसेच, गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) मंत्रिमंडळातून काढा, मुख्यमंत्री अशा लोकांना का वाचवत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.