Santosh Bangar : मराठवाड्यातील (Marathwada Flood) शेतकरी अतिशय संकटात असून, त्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली (Hingoli) येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला थेट फोन करून शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत करण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट म्हटले की, शेतकऱ्यांना मदत न केली तर त्यांच्या कार्यालयाचा चुराडा करणार असून, हात-पाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचे हित पहावे.
संतोष बांगर म्हणाले की, यंदाच्या पुरात शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे बुडाली आहे. सोयाबीन, कापूस, तुरी यांसह शेतातील माती वाहून गेली आहे. त्यामुळे पीक विमा कंपनीने तातडीने सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे. त्यांनी अधिकाऱ्याला स्पष्ट आव्हान दिले की, वस्तुस्थितीला धरून निर्णय घ्या; काहीही विलंब झाल्यास हिंगोलीतील कोणताही अधिकारी सुरक्षित राहणार नाही.
संतोष बांगर यांनी एबीपीशी बोलताना सांगितले की, “शेतकरी संकटात आहे, आत्महत्या करत आहेत. जर पीक विमा कंपनी थातूरमातून कारणे सांगत असेल, तर त्यांना त्याच भाषेत समजावले पाहिजे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाजूला आहे, पण कंपन्या काहीच करत नाहीत. मी जी वस्तुस्थिती मांडली, त्यामुळे पीक विमा कंपनीला खरी परिस्थिती समजली असेल.”
आमदार संतोष बांगर यांनी स्पष्ट सांगितले की, “मी यानंतर पुन्हा बोलणार नाही. जे काही आहे, ते नियमानुसार करा.” पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने उत्तर दिले की, ते वार्षिक स्थिती दाखवणार आहेत.