Anil Parab On Ramdas Kadam: शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) नेते आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) आणि त्यांच्या वडिल रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, “ज्या राज्याचा गृहराज्यमंत्री स्वतःच्या आईच्या नावावर डान्सबार चालवतो, त्याला नैतिक लाज असावी. अशा मंत्र्याने कमीत कमी राजीनामा द्यायला हवा. पोरींना नाचवून जो पैसा कमावतो, त्याला मंत्रिपदाचा नैतिक अधिकार नाही.”
परबांनी पुढे स्पष्ट केले की, “अशा नीच माणसाला कोर्टात खेचून नागडं पाडण्याची जबाबदारी माझी आहे. हे खोटं बोलत असल्याने आम्ही अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहोत. या दाव्यातील पुरावे कोर्टासमोर सादर केले जातील. त्यांना 100 टक्के माफी मागावी लागेल.”
अनिल परब यांनी मुख्यमंत्री यांच्याकडेही आवाहन केले की, “स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका. हे जे नासके आंबे आहेत, त्यांना मंत्रिमंडळातून हटवणे गरजेचे आहे.”
ते म्हणाले की, “1993 साली रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम (Jyoti Kadam) यांनी स्वतःला जाळण्याचा प्रयत्न का केला? या घटनेची चौकशी होणे आवश्यक आहे. आजही खेडमधील साक्षीदार उपलब्ध आहेत. वेळ पडली तर त्यांना कोर्टात समोर आणता येईल. घरातील लोक आत्महत्या का करत आहेत, याची मुळाशी चौकशी केली पाहिजे.”
अनिल परब यांनी पुढे सांगितले की, “माझी आज मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की, ही नार्को टेस्ट करून या घटनेचा शोध घ्यावा. मागील अधिवेशनात फक्त दोन प्रकरणे चर्चेत आली होती, पण या अधिवेशनात सर्व प्रकरणे पुराव्यासह मांडली जातील. कोणाच्या घरात जातो, हे आमच्या संस्कृतीला पटत नाही, त्यामुळे अशी प्रवृत्ती थांबवायला हवी.”