Share

Laxman Hake: ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि आता ओबीसी; एका समाजाला किती ठिकाणी मिळणार आरक्षण? लक्ष्मण हाकेंचा सवाल, आजही आंदोलन न उभं राहिल्याची खंत व्यक्त करत म्हणाले…

Laxman Hake:  राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही कायम आहे आणि त्याचवेळी ओबीसी आरक्षणावरही तणावाचं वातावरण दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी सरकारला थेट प्रश्न विचारला आहे. “एका समाजाला किती ठिकाणी आरक्षण देणार?” असा त्यांचा थेट सवाल आहे.

हाकेंचा रोखठोक सवाल

बीड (Beed) जिल्ह्यातून माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, मराठा समाजाला राज्य सरकारने एसईबीसी आरक्षण दिलं आहे, त्याचबरोबर केंद्र सरकारने ईडब्ल्यूएस अंतर्गत शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण मंजूर केलं आहे. तरीदेखील आता ओबीसी आरक्षणातून देखील मागणी केली जातेय. “ईडब्ल्यूएसमधलं घ्या, एसईबीसीमधलं घ्या आणि पुन्हा ओबीसीतूनही घ्या… मग एका समाजाला किती ठिकाणी आरक्षण देणार?” असा सवाल त्यांनी केला.

ओबीसी आरक्षण संपल्याने नेतृत्व थांबलं

हाकेंनी खंत व्यक्त केली की, गावपातळीवर ओबीसी समाजातील सरपंच, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, महापौर अशी नेतृत्वाची संधी मिळत होती. पण आरक्षण संपल्याने या पदांवर ओबीसींचा आवाज कमी झाला आहे. “आजही या अन्यायाविरोधात मोठा उठाव होताना दिसत नाही, हीच खरी खंत आहे,” असं ते म्हणाले.

ओबीसी जोडो अभियान यात्रा होणार सुरू

ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आता राज्यभर मोठी मोहीम उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातून “ओबीसी जोडो अभियान” या यात्रेची सुरुवात होणार असून चार ते पाच टप्प्यात हा कार्यक्रम पार पडेल. हाके यांनी सांगितलं की, पावसामुळे आणि शेतकऱ्यांच्या अडचणीमुळे मोहीम थांबवावी लागली होती. मात्र आता सणासुदीचा काळ संपल्याने पुन्हा ही लढाई सुरू होईल.

“ही यात्रा पार पडल्यावर महाराष्ट्रभर ओबीसी समाज एकजुटीने उभा राहिलेला दिसेल. न्याय हक्कासाठीचा हा उठाव उशिरा का होईना पण जोरदार होणार आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now