Kiran Mane : सामाजिक आणि राजकीय विषयांवर थेट भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे आधीही गदारोळ झालेला असताना, आता नव्या पोस्टवरून नाशिकमध्ये (Nashik) वातावरण तापले आहे.
नेपाळ आंदोलनावरून वाद
सध्या नेपाळ (Nepal) येथे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर किरण मानेंनी 9 सप्टेंबर रोजी त्यांच्या फेसबुक खात्यावर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी “भक्तडुक्कर पिलावळींनो, नेपाळ बघताय नं? आपल्याकडे फरक इतकाच असेल की, रंगा बिल्ला अनाजीपंतासोबत तुम्हीही पिसले जाणार. सुट्टी नॉट” अशी वादग्रस्त टिप्पणी केली होती.
या मजकुरावरून भाजप (BJP) समर्थक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. विशेषतः नाशिकमधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांनी या पोस्टवर कारवाईची मागणी केली आहे.
ABVP कडून पोलिसांत तक्रार
या पोस्टविरोधात नाशिक सायबर पोलीस ठाण्यात सागर तानाजी शेलार (Sagar Tanaji Shelar) या 31 वर्षीय तरुणाने तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटलं आहे की, मानेंची पोस्ट ही भारतातील लोकशाहीविरोधी आहे, ती लोकांना उठावासाठी प्रवृत्त करणारी आहे आणि त्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याचा धोका आहे.
तक्रारीत असा दावा करण्यात आला आहे की, या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात अवमानकारक मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यामुळे समाजातील शांतता भंग होण्याची शक्यता आहे.
किरण माने यांचे केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Government) वारंवार टीका करणारे पोस्ट्स चर्चेत राहिलेले आहेत. त्यांच्या वक्तव्यांमुळे त्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला आहे. आता मात्र नेपाळ आंदोलनाच्या संदर्भात केलेल्या पोस्टमुळे ते पुन्हा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत.