Samruddhi Expressway Accident : महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा म्हणून ओळखला जाणारा समृद्धी महामार्ग (Samruddhi Expressway) सतत अपघातांच्या आणि विचित्र घटनांच्या चर्चेत असतो. नुकतीच मध्यरात्री झालेली एक घटना पाहून वाहनचालक हैराण झाले. नागपूरकडून (Nagpur) मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या अनेक गाड्या अचानक पंक्चर झाल्याचे समोर आले. लोकांनी गाड्या थांबवून तपासणी केली असता ब्रिजवर विशिष्ट प्रकारचे खिळे ठोकलेले असल्याचे आढळले.
सुरुवातीला लोकांना वाटले की हा चोरट्यांचा डाव आहे आणि पंक्चर झाल्यानंतर वाहनं थांबल्यावर लूट केली जाणार होती. पण तपासात वेगळंच वास्तव समोर आलं. महामार्गाचे दुरुस्तीचं काम करणाऱ्या कंपनीनेच हे खिळे ठोकल्याचं स्पष्ट झालं. मात्र, काम सुरू असतानाही बॅरिकेटिंग का करण्यात आलं नाही, हा प्रश्न उपस्थित होतो. तसेच गाड्या पंक्चर झाल्यानंतर हे खिळे रात्रीच काढून टाकण्यात आले, दिवसा काढले असते तर लोकांना होणारा त्रास टाळता आला असता, असा आरोप होत आहे.
या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन कोणाचं जीवितहानी झाली असती तर जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जातोय. सामान्य नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दलही प्रशासनावर टीका होते आहे. आता या प्रकरणी संबंधित यंत्रणा नेमकी कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईतील दहिसर (Dahisar) टोलनाका अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचं कारण ठरत होता. या टोलनाक्यामुळे दहिसर परिसरात वाहनांची मोठी गर्दी होत असे. स्थानिक नागरिकांनी वारंवार याबाबत सरकारकडे तक्रारी केल्या. अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य केली असून टोलनाका वर्सोवा पुलासमोरील (Versova Bridge) नर्सरीजवळ स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (MSRDC) आदेश देण्यात आले. दिवाळीपूर्वी स्थलांतर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यामुळे दहिसर ते मीरा भाईंदर (Mira Bhayandar) आणि मीरा भाईंदर ते अंधेरी (Andheri) प्रवास अधिक सुकर होणार आहे. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते.