Share

Babaraje Jagtap: अजित पवारांना IPS अंजना कृष्णांशी फोनवर बोलायला लावणाऱ्या बाबाराजे जगतापांचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; गंभीर गुन्ह्यांची नोंद अन्…

Babaraje Jagtap:  राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar group NCP) माढा तालुकाध्यक्ष बाबाराजे जगताप (Babaraje Jagtap) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सोशल मीडियावर त्यांचा नशा करतानाचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या विरोधात आधीपासूनच अनेक गुन्हे नोंद आहेत आणि आता या नव्या घडामोडीमुळे त्यांच्यावर राजकीय तसेच कायदेशीर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

बाबाराजेंच्या वादांचा इतिहास

जगताप यांचे नाव यापूर्वीही चर्चेत आले होते. माढा तालुक्यातील कुर्डू (Kurdu village) प्रकरणादरम्यान त्यांनी महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) यांना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी मोबाईलवर जोडले होते. त्या वेळी अजित पवार आणि अधिकाऱ्यांमधील संभाषणाचा व्हिडीओ समोर आला होता. त्यात अजित पवार अधिकाऱ्यांवर रागावत कार्यवाही थांबवण्याचे आदेश देताना दिसले, ज्यावरून मोठा वादंग झाला.

जगताप यांच्याविरोधात अवैध मुरुम उपसा, सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यांना धमकावणे असे गंभीर गुन्हे आधीच नोंद आहेत. त्यामुळेच नशेच्या व्हिडीओमुळे त्यांच्यावर आणखी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नेमकं घडलं काय?

31 ऑगस्ट रोजी कुर्डू गावात अवैध खननाविषयी तक्रारीनंतर पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये वाद झाला. यादरम्यान बाबाराजे जगताप यांनी अंजना कृष्णा यांच्याकडून मोबाईल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला. पवार यांनी स्वतःची ओळख देत कार्यवाही थांबवण्याचा आदेश दिला. त्यानंतर त्यांनी व्हिडीओ कॉलवरून अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापले आणि जगताप यांच्याविरोधात एफआयआरमध्ये त्यांचे नाव वरच्या क्रमांकावर आले.

बाबाराजेंची बाजू

जगताप यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, संबंधित काम हे ग्रामपंचायतीमार्फत कायदेशीर पद्धतीने सुरू होते. खोटी माहिती देऊन त्याला अवैध ठरवण्यात आले, म्हणूनच पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी अजित पवार यांना संपर्क केला. तसेच, व्हिडीओ व्हायरल करण्यामागे आपले कार्यकर्ते नसून महिला अधिकाऱ्यांचा अंगरक्षक किंवा ड्रायव्हर जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. या सगळ्याचा उद्देश अजित पवार यांची प्रतिमा मलिन करणे हा असल्याचा दावा त्यांनी केला.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now