Sanjay Raut on Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळजनक आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना (Shiv Sena Thackeray group) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut MP) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar DCM) यांच्यावर थेट बोचरी टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांनी उपमुख्यमंत्र्यांना फोन लावला म्हणजे ते त्यांचेच माणसं होते. अशा लोकांना संरक्षण देण्याची मागणी केली जात असेल तर याला तणाव म्हणत नाहीत, सरळ दादागिरी म्हणतात.
संजय राऊत यांनी अजित पवारांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करताना म्हटलं, “तुम्ही भाषणांमध्ये वारंवार सांगता की मी नियमबाह्य काम करत नाही, पण प्रत्यक्षात पोलिसांना बेकायदेशीर कामे थांबवू नका असा दबाव टाकला जातो. मग यात नैतिकतेचं काय?” असं वक्तव्य त्यांनी केलं.
महिला अधिकाऱ्याबाबत अन्याय?
या वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) यांच्या कामावर राऊतांनी ठाम भूमिका मांडली. “त्या अधिकाऱ्याचं काय चुकलं? त्यांनी फक्त कायदा आणि नियम सांगितला. हे त्यांचं कर्तव्य आहे. जर मंत्र्यांनी कायदा मोडला, तर अधिकाऱ्यांनी संविधान दाखवून दिलं पाहिजे. पण उलट त्यांच्यावरच प्रश्न उपस्थित होणं म्हणजे थेट धमकीच आहे.” असे संजय राऊत म्हणाले.
90% मंत्रिमंडळ खाली जाईल!
राऊतांनी अजून एक गंभीर विधान करताना म्हटलं की, “जर खरंच नैतिकता पाळायची असेल, तर महाराष्ट्रातील 90% मंत्री घरात बसतील. शिंदे गटातील सगळे मंत्री बाजूला होतील. अजित पवारांसोबतचे मंत्रीदेखील नैतिकतेच्या मुद्द्यावर तग धरणार नाहीत. कारण प्रत्येकावर आरोप आहेत, काहींवर गुन्हे दाखल आहेत. मग अशा परिस्थितीत नैतिकतेचा गाजावाजा करणं हास्यास्पद आहे.”
राऊतांनी अजित पवारांना थेट सल्ला देत म्हटलं की, “उगाच नाकाने कांदे सोलू नका. तुम्हीदेखील त्या मंडळींपैकीच आहात ज्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. त्यामुळे जनतेला उपदेश करण्याऐवजी स्वतःच्या पायाखालची वाळू ढळतेय हे लक्षात घ्या.”