Pune Khed Accident : दर्शनाला जाताना काळाचा घाला, घाटातून जाताना गाडी दरीत पलटी, ७ महिलांचा जागीच मृत्यू, ३० जण जखमी

Pune Khed Accident : पुणे जिल्ह्यात (Pune District) आज सकाळी एक हृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. दर्शनाच्या आनंदात निघालेल्या महिला भाविकांच्या गाडीचा प्रवास काही क्षणांत शोकांतिका ठरला. खेड तालुक्यातील (Khed Taluka) घाट रस्त्यावरून जाताना पिकअप जीपचा ताबा सुटला आणि ती थेट दरीत कोसळली. यात ७ महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर ३० पेक्षा जास्त महिला गंभीर जखमी झाल्या असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

नेमकं घडलं काय?

पापळवाडी (Paplawadi) परिसरातील महिला भाविकांचा गट आज कुंडेश्वर (Kundeshwar) शिव मंदिराच्या दर्शनासाठी निघाला होता. घाट चढताना नागमोडी वळणावर पिकअप जीपचा ताबा सुटल्याने वाहनाला रिटर्न लागला. काही क्षणांतच जीप ५ ते ६ वेळा पलटी होऊन रस्त्याच्या कडेला खोल दरीत कोसळली. या धक्कादायक घटनेत ७ महिलांचा मृत्यू झाला असून उर्वरित ३० ते ३५ जणी जखमी आहेत.

जखमींवर उपचार सुरू

अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने पाईट (Pait) येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं. काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी पुण्यातील मोठ्या रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू आहे.

पोलिसांचा तपास

या अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस स्टेशनचे (Khed Police Station) पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, वाहन रिटर्न आल्यामुळे चालकाचा ताबा सुटला असावा. या दुर्दैवी अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून गावागावात हळहळ व्यक्त होत आहे.