Dadar Kabutar Khana: गुजरातच्या पतंग महोत्सवात मांजाने मान कापून पक्षी मरतात, तेव्हा तुमचा धर्म कुठे जातो; मनीषा कायंदेंचा जैनधर्मीयांना सडेतोड सवाल

Dadar Kabutar Khana: मुंबईत (Mumbai) दादर कबुतरखाना (Dadar Kabutar Khana) हा विषय गेल्या काही दिवसांपासून तापलेला आहे. साध्या शेतकरी माणसालाही किंवा गावाकडच्या एखाद्या माणसालाही ही गोष्ट ऐकून मनात हळहळ निर्माण व्हावी, इतकं वातावरण तापलंय. शहरात चालण्यासाठी असलेले फुटपाथ भरून कबुतरांना दाणे टाकायचे प्रकार सुरू आहेत. काल तर थेट पाच किलो धान्य फुटपाथवर ओतलं गेलं. लोकांना चालायला जागाच उरली नाही. अशा गोष्टी धर्माच्या नावाखाली कशा काय चालतात, असा संताप शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी व्यक्त केला.

“धर्म कुठे जातो मग गुजरातच्या पतंग महोत्सवात?”

मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी जैन समाजाला थेट सवाल करत म्हटलं, “गुजरातच्या (Gujarat) पतंग महोत्सवात कितीतरी पक्षी मांजाच्या (Manja) धाग्याने गळा कापून मरतात. काहींचे पंख, तर काहींचे पाय कापले जातात. त्यावेळी धर्म कुठे जातो? तेव्हा धर्माचा प्रश्न कोणी उपस्थित करत नाही. पण मुंबईत कबुतरांवरून एवढं आंदोलन?”

त्यांनी सांगितलं, कबुतरांचा त्रास हा धार्मिक नसून वैज्ञानिक विषय आहे. कबुतरं फक्त धान्य खात नाहीत, तर कीटकसुद्धा खातात. त्यांच्या विष्ठेतून धोकादायक फंगस तयार होतो, ज्यामुळे माणसांचा मृत्यूही होतो. “ज्यांचा मृत्यू अशा आजाराने झाला, त्याला कोण जबाबदार?” असा सरळ सवाल कायंदेंनी विचारला.

“धर्माच्या नावाखाली अतिरेक नको”

काल दादर कबुतरखान्याबाहेर जैन समाजाने मोठं आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांपर्यंतही हा मुद्दा पोहोचला. मनीषा कायंदे (Manisha Kayande) म्हणाल्या, “कबुतरांना दाणे टाकायचे असतील तर आपल्या इमारतीच्या टेरेसवर टाका. फुटपाथ लोकांसाठी असतात, कबुतरांसाठी नाही. तुम्ही दाणे टाकता म्हणून कबुतरं तिथे येतात. देवाने त्यांना पंख दिलेत, ते स्वतःचं अन्न शोधू शकतात. तुम्ही त्यांना अवलंबून करून ठेवलंय.”

त्यांनी अजूनही स्पष्ट केलं की, जैन धर्मात असा अतिरेक लिहिलेला नाही. “कबुतरं पाळणं हे धार्मिक कर्तव्य नाही, आणि निवडणुकीत नोटाचं बटण दाबून धमक्या देणंही योग्य नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

कायंदेंनी प्रश्न केला, “मुंबईतील ५१ कबुतरखाने कोणी सुरु केले? हायकोर्टाच्या निकालात स्पष्ट लिहिलंय की पूर्वी तिथे पाणपोई होती. लोकांनी धान्य टाकायला सुरुवात केली आणि कबुतरखाने तयार झाले. मग अशा प्रकारे धान्य टाकणं कायद्याच्या चौकटीत बसतं का?”

त्यांनी हेही सांगितलं की, मी प्राणीशास्त्रात पीएचडी केलंय (PhD in Zoology), हवं तर प्राणीतज्ज्ञांनाही विचारा. जैन धर्मातसुद्धा बरेच डॉक्टर आहेत, त्यांच्याकडूनही विचारावं की कबुतरांच्या या पद्धतीचा माणसांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो.

मुंबईतील कबुतरखान्यांचा वाद फक्त धार्मिक नाही, तर आरोग्य आणि कायद्याशी निगडित आहे. लोकांच्या आरोग्याचं रक्षण करताना धर्माचा अतिरेक टाळणं गरजेचं आहे, असं मनीषा कायंदे (Manisha Kayande) ठामपणे म्हणतात. आता हा वाद पुढे कुठे जाईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.