Ramdas Kadam: मुंबईत (Mumbai) चाललेल्या सावली बार (Sawali Bar) वादात आता आणखी एक धक्कादायक वळण आलं आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या आईच्या नावावर असलेल्या या बारवरून अनिल परब (Anil Parab) यांनी गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं. या पार्श्वभूमीवर परब सावली बारविरोधात आणखी गौप्यस्फोट करतील अशी चर्चा होती, मात्र त्यांची पत्रकार परिषद अचानक रद्द झाली.
सावली बारविरोधात ‘गुपितं’ नेण्यासाठी भेट?
याच वेळी, माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे सख्खे भाऊ सदानंद कदम (Sadanand Kadam) थेट शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांच्या कार्यालयात दाखल झाले. यामुळे चर्चेला चांगलाच उधाण आलं. कदम बंधूंमध्ये आधीपासूनच वाद असल्याने, सदानंद कदम परबांना काही महत्त्वाची माहिती किंवा पुरावे देण्यासाठी आले का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात फिरू लागला आहे.
विधान परिषदेत परबांचा स्फोटक आरोप
विधान परिषदेतील भाषणात अनिल परब यांनी उघड केले की, कांदिवली (Kandivali) येथील सावली बारवर पोलिसांनी छापा टाकला असता, तब्बल 22 बारबाला पकडण्यात आलं होतं. त्याच्यासह 4 ग्राहक आणि 4 कर्मचारी अटक झाले होते. चौकशीत बारचा परवाना ज्योती कदम (Jyoti Kadam) या गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावावर असल्याचं समोर आलं. त्यामुळे एका बाजूला ‘लाडक्या बहिणींना आशीर्वाद’, तर दुसऱ्या बाजूला ‘आया-बहिणींना डान्सबारमध्ये नाचवणं’ असा परबांनी टोला लगावला आणि थेट राजीनाम्याची मागणी केली.
कदमांचा प्रतिहल्ला
परबांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना रामदास कदम यांनी मान्य केलं की बार पत्नीच्या नावावर आहे, मात्र तो ते स्वतः चालवत नाहीत. करारानुसार बार चालवणारा व्यक्ती जबाबदार असल्याचं त्यांनी सांगितलं. “माझ्या पत्नीच्या नावावर 30 वर्षांपासून परवाना आहे, व्यवसाय करणे हा गुन्हा आहे का?” असा सवाल करत कदमांनी परबांना “अर्धवट ज्ञानी वकील” म्हणून हल्ला चढवला.
या सर्व घडामोडींमुळे सावली बार प्रकरण केवळ कायदेशीर चौकटीत मर्यादित न राहता थेट ‘कदम विरुद्ध परब’ अशा राजकीय रणभूमीवर पोहोचले आहे. आणि आता कदम बंधूंपैकी एक परबांच्या भेटीला गेल्याने या प्रकरणात नवा ‘बारुद’ भरला गेलाय, हे नक्की.