Kinetic DX Electric Scooter : एकेकाळी भारतीय रस्त्यांवर आपल्या खास डिझाईन आणि दमदार कामगिरीमुळे अधिराज्य गाजवणारी कायनेटिक डीएक्स आता नवे रूप घेऊन परतली आहे. कायनेटिक इंजिनियरिंग लिमिटेड (Kinetic Engineering Ltd.) या कंपनीने आपल्या नवीन कायनेटिक डीएक्स इव्ही मालिकेच्या लाँचद्वारे पुन्हा एकदा दुचाकी क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. ही स्कूटर त्यांच्या कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्स लिमिटेड (Kinetic Watts & Volts Ltd.) या इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपनीतून बनवण्यात आली आहे.
जुनं रूप, नवी ताकद
अनेक पिढ्यांच्या आठवणीत घर करून बसलेली डीएक्स आता इलेक्ट्रिक अवतारात आली आहे. जुन्या आकर्षक डिझाईनसोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत, इटालियन डिझाईनर्सच्या मदतीने तयार करण्यात आलेली ही स्कूटर पूर्णपणे कौटुंबिक वापरासाठी योग्य आहे. मजबूत मेटल बॉडी, प्रशस्त फ्लोरबोर्ड आणि आरामदायी सीट डिझाईनमुळे तिचा वापर सहज शक्य आहे.
सीटखाली तब्बल 37+ लिटरचं स्टोरेज देण्यात आलं आहे, जे या सेगमेंटमधलं सर्वात मोठं आहे. यात एक पूर्ण आकाराचं हेल्मेट, एक अर्धं हेल्मेट आणि लहानसहान वस्तू सहज ठेवता येतात.
दमदार बॅटरी आणि रेंज
या स्कूटरमध्ये रेंज-एक्स द्वारे विकसित 2.6 केडब्ल्यूएच क्षमतेची एलएफपी बॅटरी बसवण्यात आली आहे, ज्याचं आयुष्य सामान्य एनएमसी बॅटरी असलेल्या स्कूटर्सपेक्षा तब्बल चारपट जास्त आहे. ही बॅटरी डीएक्स+ व्हेरियन्टमध्ये 116 किमीपर्यंतची आयडीसी रेंज देते. के-कोस्ट रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी, 60 व्ही सिस्टम आणि दमदार मोटरच्या जोरावर स्कूटर 3 मोड्समध्ये (रेंज, पॉवर, टर्बो) ताशी 90 किमीपर्यंत वेग घेऊ शकते.
दोन्ही मॉडेल्समध्ये रिव्हर्स मोड आणि हिल-होल्ड फीचर्स दिले आहेत. फ्रंट टेलिस्कोपिक सस्पेंशन, अॅडजस्टेबल रियर शॉक अॅब्जॉर्बर्स, 220 मिमी फ्रंट डिस्क, 130 मिमी रियर ड्रम आणि कॉम्बी ब्रेकिंग सिस्टममुळे प्रवास अधिक सुरक्षित बनतो.
आधुनिक कनेक्टिव्हिटी
कायनेटिक डीएक्ससोबत समर्पित मोबाइल अॅप दिलं आहे, तर डीएक्स+ मध्ये प्रगत टेलीकायनेटिक फीचर्स उपलब्ध आहेत. यात रियल-टाइम राईड डेटा, जिओ फेन्सिंग, इंट्रूडर अलर्ट, फाइंड माय कायनेटिक, ट्रॅक माय कायनेटिक यांसारखे पर्याय आहेत. माय कायनी कम्पॅनियन फिचरमुळे स्कूटर चालकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं, सुरक्षा सूचना देणं यांसारखे व्हॉईस अलर्ट मिळतात. ब्लूटुथ कनेक्टिव्हिटीसह बिल्ट-इन स्पीकर, म्युझिक प्लेयर आणि व्हॉईस नेव्हिगेशनही यात दिलं आहे.
बुकिंग आणि किंमत
फक्त 35,000 गाड्यांपुरतं बुकिंग खुले आहे. वितरण सप्टेंबरपासून सुरू होईल. kynaeticEV.in वरून 1,000 रुपये भरून बुकिंग करता येईल.
-
कायनेटिक डीएक्स किंमत: ₹1,11,499 (एक्स-शोरूम, पुणे) – सिल्व्हर, काळा रंग
-
कायनेटिक डीएक्स+ किंमत: ₹1,17,499 (एक्स-शोरूम, पुणे) – लाल, निळा, सफेद, सिल्व्हर, काळा रंग
कायनेटिक इंडियाचे उपाध्यक्ष अजिंक्य फिरोदिया (Ajinkya Firodia) म्हणाले, “९० च्या दशकात डीएक्सने ग्राहकांना नवे अनुभव दिले. आज आम्ही तिचं इलेक्ट्रिक रूप सादर करताना फक्त स्कूटर नाही, तर तिची विश्वासार्हता, नाविन्य आणि मजबुतीही परत आणली आहे. ही स्कूटर इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या नव्या युगात आपली छाप सोडेल, याची खात्री आहे.”