Kolhapur : कोल्हापूरच्या नांदणी (Nandani) गावात आज वातावरण अक्षरशः शोकाकुल होतं. ३३ वर्षं गावाशी जुळलेली महादेवी हत्तीण (Mahadevi Elephant) आज गावाला कायमची सोडून निघून गेली. कोर्टाच्या (Court) आदेशानंतर तिला गुजरातच्या (Gujarat) वनतारा (Vantara) अभयारण्यात पाठवण्यात आलं. निरोपाचा क्षण इतका भावनिक होता की, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. गावातील लोकांनी हत्तीणीची मिरवणूक काढली, फुलांनी सजवलं, पण मन मात्र रडत होतं.
गावाशी असलेली ३३ वर्षांची नाळ तुटली
नांदणी मठातील ही हत्तीण जणू गावाचीच एक सदस्य होती. जैन धर्मियांच्या श्रद्धास्थान असलेल्या या मठात ती मागील ३३ वर्षांपासून राहत होती. पण ‘पेटा’ (PETA) संस्थेच्या तक्रारीनंतर न्यायालयीन वाद निर्माण झाला. आरोप असा होता की, हत्तीणीचा परवानगीशिवाय मिरवणुकीसाठी वापर होत होता. चौकशी समितीनेही अहवाल सादर करून तिची देखभाल प्राण्यांच्या हक्कांसाठी असलेल्या नियमांनुसार योग्य नाही, असं मत नोंदवलं.
कोर्टाचा अंतिम आदेश आणि गावाची निराशा
सुरुवातीला हायकोर्टाने तिला गुजरातच्या वनताराकडे पाठवण्याचा आदेश दिला. नांदणीकरांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली, पण तिथेही निराशा हाती आली. कोर्टाच्या आदेशाने आज सकाळी महादेवी हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू झाला.
निरोपाचा क्षण अश्रूंनी भिजला
गावकरी, महिला, मुले, वृद्ध सगळ्यांनी तिला शेवटचा निरोप देताना डोळ्यातलं पाणी लपवलं नाही. काही जणांनी हत्तीणीला मिठी मारली, तर काहींनी तिच्या सोंडेवर हात ठेवून डोळे मिटले. मिरवणुकीदरम्यान काही तरुणांनी गोंधळ घालून पोलिसांच्या गाडीची काच फोडली. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला.
महादेवी हत्तीणीचं आता नवीन घर होणार आहे वनतारा वाइल्डलाईफ रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर (Vantara Wildlife Rescue & Rehabilitation Centre). रिलायन्स फाउंडेशनच्या (Reliance Foundation) माध्यमातून स्थापन झालेलं हे केंद्र ३,५०० एकरांवर पसरलेलं असून, १०,००० हून अधिक प्राण्यांचं आश्रयस्थान आहे. येथे MRI, CT-Scan, हायड्रोथेरपीसारख्या आधुनिक सुविधा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ४ मार्च २०२५ रोजी या प्रकल्पाचं उद्घाटन केलं होतं.
नांदणीकरांसाठी आजचा दिवस फक्त एक प्राणी गाव सोडून गेला इतकाच नव्हता, तर गावाच्या इतिहासातील एक जिवंत आठवण संपली. महादेवी हत्तीण गावासाठी केवळ धार्मिक सोहळ्याचा भाग नव्हती, तर ती गावाच्या प्रत्येकाच्या भावनेशी जुळलेली सखी होती.