Harshal Patil Suicide Case: सांगली वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी (Tandulwadi, Walwa) या गावातील हर्षल पाटील (Harshal Patil) या तरुण कंत्राटदाराने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत केलेल्या कामांचे पैसे मिळाले नाहीत. परिणामी, कर्जाच्या ओझ्याखाली दबून त्याने आत्महत्या केली. या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP – Sharad Pawar) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून शासनाच्या कारभारावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
कोट्यवधींचं कर्ज आणि थकित बिलं
हर्षल पाटील यांनी सरकारी आदेशानुसार गावांमध्ये पाणी पुरवठ्याचं काम यशस्वीपणे पूर्ण केलं. त्यांनी स्वतःच्या नावे ६५ लाखांचं कर्ज उचलून काम केलं होतं. काम पूर्ण होऊनही सरकारकडून १.४० कोटी रुपयांची थकबाकी मिळाली नाही. पैसे न मिळाल्यामुळे आलेल्या आर्थिक तणावामुळे हर्षल यांनी गळफास घेऊन जीवन संपवलं. त्यांच्या मागे पत्नी, लहान मुलगी, वृद्ध आईवडील आणि दोन भाऊ आहेत.
‘लाडकी बहीण’वर खर्च, पण कंत्राटदारांचे पैसे नाहीत?
जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये सरकारच्या आर्थिक नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. ते म्हणाले, “लाडकी बहीण योजना जरी लोकांना मोफत सुविधा देत असली तरी त्यामागचं आर्थिक नियोजनच डळमळीत आहे. हजारो कंत्राटदारांच्या बिलांवर सरकार पैसेच नसल्याने सही करत नाही. यामुळे अनेक जण आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे आहेत.”
‘मी आधीच इशारा दिला होता…’
आव्हाड म्हणाले, “काही महिने जाऊ द्या, अनेक कंत्राटदार आत्महत्या करतील असं मी आधीच म्हटलं होतं. दुर्दैवाने त्याची सुरुवात झाली आहे. हर्षल पाटील यांचं प्रकरण ही केवळ आर्थिक नव्हे, तर प्रशासकीय अपयशाची पक्की साक्ष आहे. ही चेतावणी आहे. केवळ घटना नाही.”
‘पुढचा नंबर माझाच’
या पोस्टनंतर जितेंद्र आव्हाड यांना एका तरुणाने इनबॉक्समध्ये संदेश पाठवला. त्या तरुणाने लिहिलं, “हर्षल पाटील गेले, पुढचा नंबर माझाच असेल.” त्यानेही सरकारी यंत्रणांसाठी काम केलं असून बिलं मिळत नसल्याचं तो सांगतो. त्याचा मेसेज आणि दोघांमध्ये झालेला संवाद आव्हाडांनी फेसबुकवर स्क्रीनशॉट स्वरूपात शेअर केला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना थेट टॅग करत, त्या तरुणाला वाचवण्याची हात जोडून विनंती केली.
सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचं असंवेदनशील वास्तव!
हर्षल पाटील – वाळवा तालुक्यातील एका मेहनती तरुणाची आत्महत्या!हर्षल पाटील – सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या तांदुळवाडी गावचा एक कष्टाळू, तरुण कंत्राटदार.त्याने सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम… pic.twitter.com/pCYOzT1qcg
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 23, 2025
आव्हाड म्हणाले, “माझा अनुभव सांगतोय, पुढे अजून काही जण अशाच परिस्थितीत गमावले जातील. मी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतो की या प्रकरणांकडे वैयक्तिक लक्ष द्या. अशा युवकांना वाचवा – त्यांच्या हाती दोरी लागण्याआधी.”