Share

Manikrao Kokate : भिकारी शासन आहे, शेतकरी नाही; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर नेमकं काय म्हणाले कृषीमंत्री? एकदा वाचाच

Manikrao Kokate : काही महिन्यांपूर्वी केलेल्या “भिकारीही एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला” या विधानावरून राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) अडचणीत आले होते. या विधानावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता, तर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता या प्रकरणावर कोकाटे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

“शासन भिकारी आहे, शेतकरी नाही”

माणिकराव कोकाटे म्हणाले, “शेतकऱ्यांकडून शासन एक रुपया घेतं, त्यांना आम्ही एक रुपया देत नाही. त्यामुळे जर एक रुपया घेतला जातो, तर भिकारी कोण? शासन. शेतकरी नाही.” मात्र लोकांनी याचा अर्थ चुकून लावल्याचं ते म्हणाले. त्यांच्या म्हणण्यानुसार, एक रुपया ही रक्कम अत्यंत लहान आहे. पण त्या योजनेच्या माध्यमातून तब्बल पाच ते साडेपाच लाख बोगस अर्ज त्यांच्या कार्यकाळात उघड झाले आणि त्यांना तत्काळ रद्द करण्यात आलं. त्यांनी यावर विविध निर्णय घेतले आणि आजपर्यंत किमान ५२ जीआर प्रसिद्ध केले असल्याचंही सांगितलं.

कृषी विभागात मोठा बदल होणार

राज्यभर शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्याचे नमूद करताना, कोकाटे म्हणाले की, ते शेतात, बांधावर, संशोधन केंद्रांमध्ये गेले आहेत. जिथं सुविधा नव्हत्या, तिथं सुविधा देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पुढील सहा महिन्यांत कृषी खात्यात मोठा बदल पाहायला मिळेल. “आजपर्यंत एकही कृषीमंत्री संशोधन केंद्रावर गेला नव्हता, मी गेलो,” असंही त्यांनी ठासून सांगितलं.

रमी प्रकरणावरही दिलं उत्तर

दरम्यान, सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात कोकाटे मोबाईलवर ‘रमी’ (Rummy) गेम खेळताना दिसत आहेत, असं दावा केला जातोय. यावर कोकाटे म्हणाले, “मला रमी खेळताच येत नाही! आणि माझा मोबाईल किंवा बँक खाते रमी अॅपशी जोडलेलं नाही.” त्यांनी आरोप करणाऱ्या नेत्यांना कोर्टात खेचण्याचा इशाराही दिला.

“विरोधकांनी माझी बदनामी केली”

या सगळ्या आरोपांमुळे राज्यात आपली बदनामी झाली असल्याचं कोकाटे यांनी सांगितलं. त्यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असून, यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोपही त्यांनी केला. “कोर्टात न्या, चौकशी करा, काहीही करा… मी निर्दोष आहे,” असं म्हणत त्यांनी विरोधकांना पुन्हा इशारा दिला.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now