Pravin Gaikwad: अक्कलकोट (Akkalkot) येथे संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) चे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्यावर शाईफेक झाली असून, या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रवीण गायकवाड हे एका कार्यक्रमासाठी फत्तेसिंह शिक्षण संस्था (Fattesingh Shikshan Sanstha) आणि सकल मराठा समाज (Sakal Maratha Samaj) यांच्या वतीने अक्कलकोटमध्ये आले असताना हा प्रकार घडला. त्यांच्या संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचा एकेरी उल्लेख झाल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आणि शाईफेक केली.
या घटनेनंतर भाजप (BJP) कार्यकर्ता दीपक काटे (Deepak Kate) याच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी फोनवरून प्रवीण गायकवाड यांच्याशी संवाद साधून पाठिंबा दर्शवला. पंढरपूरमध्ये संभाजी ब्रिगेड व पुरोगामी संघटनांनी या घटनेचा निषेध करत गायकवाड यांच्यावर दुग्धाभिषेक केला.
प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना काही धक्कादायक आरोप केले. त्यांनी सांगितले की, “माझ्यावर हल्ला करणारा दीपक काटे हा भाजप युवा मोर्चाचा सरचिटणीस असून त्याच्यावर आधीपासूनच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. हा हल्ला पूर्वनियोजित होता. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या एका बैठकीत बामसेफ (BAMCEF) आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांना संपवण्याचा कट रचण्यात आला होता. २०१४ पासून पुरोगामी विचारवंतांवर योजनाबद्ध पद्धतीने हल्ले होत आहेत. दीपक काटेसारख्या गुन्हेगाराकडून हल्ला करवण्यात आलाय.”
प्रवीण गायकवाड यांचा आणखी एक गंभीर आरोप म्हणजे, “दीपक काटे याला वाचवण्यासाठी मंत्रालयातून फोन येत आहेत. इतक्या गंभीर प्रकारानंतरही त्याच्यावर किरकोळ गुन्हे लावून सैल सुटका करण्याचे प्रयत्न होत आहेत. यामध्ये अनेकांच्या सोन्याच्या चैन चोरीला गेल्या, गाड्यांचे नुकसान झाले. याची जबाबदारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आहे. ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीही आहेत, त्यामुळे ही जबाबदारी त्यांची आहे.”
दुसरीकडे, दीपक काटे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावात छत्रपती किंवा धर्मवीर असा सन्मानपूर्वक उल्लेख असावा. एकेरी उल्लेखामुळे संभाजी महाराजांचा अपमान होतो. आम्ही मागील दीड-दोन वर्षांपासून संघटनेच्या नावात बदल करण्याची मागणी करत आहोत. शिवाय संभाजी ब्रिगेडचे ज्ञानेश महाराव (Dnyanesh Maharao) यांनी स्वामी समर्थ महाराज (Swami Samarth Maharaj) यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं होतं. आणि त्यांचेच प्रदेशाध्यक्ष त्या भूमीत येऊन सत्कार स्वीकारतात, याचा आम्ही निषेध नोंदवला.”