Beed News: बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambajogai) येथे एक चकित करणारी आणि धक्कादायक घटना घडली आहे. एका नवजात बाळाला मृत घोषित केल्यानंतर जेव्हा त्याचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी तयारी करत होते, तेव्हाच बाळाने हालचाल केली आणि रडू लागले. या घटनेमुळे एकीकडे आश्चर्य तर दुसरीकडे रुग्णालयाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, केज (Keij) तालुक्यातील होळ (Hol) गावातील एका महिलेस सोमवारी रात्री प्रसूतीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात (Swami Ramanand Teerth Hospital) दाखल करण्यात आले. मंगळवारी (ता. 8) पहाटे त्या महिलेला वेळेपूर्वी प्रसूती झाली. बाळाचा जन्म कमी वजनात – सुमारे 900 ग्रॅम – झाला होता. जन्मानंतर बाळात कोणतीही हालचाल जाणवत नव्हती. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केलं.
अंत्यसंस्कारापूर्वी घडला चमत्कार
बाळाला मृत समजून नातेवाईक होळ येथे अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले. मात्र, एका वृद्ध महिलेने बाळाला उघडून पाहिलं असता, त्यात हालचाल जाणवली. त्या महिलेने बाळाला कुशीत घेतलं, आणि काही क्षणांतच बाळ रडू लागलं. या दृश्यामुळे उपस्थित सगळे सुन्न झाले. तत्काळ बाळाला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, आणि सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाकडून चौकशी
स्त्रीरोग व प्रसूती विभागप्रमुख डॉ. गणेश तोडगे (Dr. Ganesh Todge) यांनी स्पष्ट केलं की, बाळाची प्रसूती पूर्ण काळापूर्वी झाली आणि वजनही अत्यल्प होतं. त्यामुळे जन्मानंतर कोणतीही हालचाल दिसली नाही, ही बाब खरी असू शकते. मात्र, अशी चूक पुन्हा होऊ नये यासाठी अंबाजोगाई रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश कचरे (Dr. Rajesh Kachare) यांनी तातडीने चौकशी समिती स्थापन केली असून, दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं आहे.
कुटुंबाच्या दुःखात आशेचा किरण
या घटनेमुळे बाळाच्या कुटुंबाला क्षणभर जो मोठा आघात बसला होता, त्याच दु:खात अचानक आशेचा नवा किरण फुलून आला. मात्र या प्रकारामुळे रुग्णालय व्यवस्थापनाच्या कामकाजावर गंभीर शंका उपस्थित होत आहेत.