Devendra Fadnavis : ‘एकनाथ शिंदे-अजित पवार’ प्रकरणात नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाचं फडणवीसांनी केलं कौतूक, म्हणाले..

Devendra Fadnavis: मुंबईमध्ये फेडरेशन ऑफ कॉर्पोरेट या संस्थेच्या वतीने झालेल्या नागरी सत्कार कार्यक्रमात राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नार्वेकर यांच्या निर्णयशक्तीचं आणि कार्यक्षमतेचं कौतुक केलं.

फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरुवात इंग्रजीतून केली आणि नंतर मराठीचा वापर करत सांगितलं की, नवीन शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्र महत्त्वाचं असून, मराठीतून बोलल्यास त्यांचे विचार राज्यातील जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचतात.

कार्यक्रमादरम्यान बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीच्या वेळेस विधी-ज्ञान असणारे अध्यक्ष आवश्यक होते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ‘मूळ शिवसेना’ (Original Shiv Sena) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी ‘मूळ राष्ट्रवादी’ (Original NCP) घेऊन बाहेर पडल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचं नेतृत्व सक्षमपणे करणं गरजेचं होतं.

त्यांनी पुढे सांगितलं की, “अध्यक्षपदासाठी माझ्यासमोर एकच चेहरा होता राहुल नार्वेकर. त्यांच्या नावावर मी ठाम होतो आणि आज त्यांनी आपल्या निर्णयांमधून सिद्ध केलं की माझी निवड अचूक होती.”

फडणवीस म्हणाले, “विधानसभा अध्यक्ष हे केवळ सभागृह चालवणारे नसून, ते अनेकदा न्यायाधीशासारखंही काम करतात. त्यांना माहिती गोळा करून निर्णय द्यावा लागतो.”

राहुल नार्वेकर यांनी दिलेले निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालीही योग्य ठरले, हे अधोरेखित करत फडणवीस म्हणाले की, “मी त्यांना अध्यक्ष म्हणून निवडून अगदी बरोबर निर्णय घेतला होता.”

या कार्यक्रमातून फडणवीस यांनी नार्वेकरांच्या नेतृत्वाबाबतचा आत्मविश्वास आणि त्यांचं कायदेशीर ज्ञान सार्वजनिकरित्या अधोरेखित केलं आहे.