Share

Bhandara News : मी उडी मारतो, तू रील काढ; उडी मारताच तरुण बुडाला, मित्र अभिनय समजून व्हिडिओ काढत राहिले..

Bhandara News :  भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील पवनी (Pavani) तालुक्यातील सोनेगाव (Sonegav) परिसरात एक अत्यंत वेदनादायक घटना समोर आली आहे. तीर्थराज बारसागडे (Teerthraj Barsagade) या अठरा वर्षांच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना रील व्हिडिओ बनवताना घडली असून, मृत्यूचा क्षण चक्क कॅमेऱ्यात कैद झाला.

ही दुर्घटना शनिवारी घडली. तीर्थराज हा कोंढा (Kondha) येथील जागृती कनिष्ठ महाविद्यालयात (Jagruti Junior College) बारावीमध्ये शिक्षण घेत होता. शनिवारी तो आपल्या मित्रांसोबत शेताजवळ गेला होता. शेतालगत असलेल्या एका छोट्या तलावाच्या काठावर उभ्या असलेल्या झाडावर तो चढला आणि त्याने आपल्या मित्रांना “मी उडी मारतो, तुम्ही रील काढा,” असं सांगितलं.

झाडावरून त्याने थेट तलावात उडी मारली. मात्र पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने तो थेट खोल भागात गेला आणि बुडू लागला. पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्यानंतर त्याने मदतीसाठी आरडाओरड केली, हातपाय हालवले. पण मित्रांना वाटले की हा सगळा अभिनय आहे आणि ते त्याचे शूटिंग करत राहिले.

दुर्दैवाने कुणीही त्याला मदतीसाठी धावून गेलं नाही. काही वेळात तो पाण्यात पूर्ण बुडाला. त्यानंतर मित्रांनी गावकऱ्यांना माहिती दिली आणि शोधमोहीम सुरू झाली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

ही घटना केवळ दुर्लक्षामुळेच नव्हे, तर सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ बनवण्याच्या आंधळ्या नादामुळे घडल्याचं स्पष्ट होतं आहे. रीलच्या दुनियेत हरवलेली तरुणाई कोणत्या टोकाला जाऊ शकते, याचा हा धक्कादायक नमुना आहे.

 

क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now