Shiv Sena Symbol Dispute: शिवसेना पक्षाच्या (Shivsena) पारंपरिक ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर मालकीसंदर्भात गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेला वाद आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर १६ जुलै २०२५ रोजी या प्रकरणावर सुनावणी निश्चित केली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
वादाची सुरुवात कशी झाली?
जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडली होती. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या समर्थक आमदारांसह वेगळा गट स्थापन केला आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळलं. त्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गटाला ‘शिवसेना’ हे अधिकृत नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह दिलं. तर उद्धव ठाकरे यांना ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नवे नाव व ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आले. या निर्णयाला ठाकरे गटाने आव्हान दिलं.
सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
२ जुलै रोजी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्यावतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत (Devdutt Kamat) यांनी मांडणी करताना म्हटलं की लोकांना निवडणूक चिन्ह निवडण्याचा अधिकार आहे. यावर न्यायालयाने विचारलं की, ‘इतकी तातडी का?’ अखेर १६ जुलैला अंतिम सुनावणी घेण्याचं निश्चित झालं.
कायदेशीर बाजू काय म्हणते?
ठाकरे गटाचं म्हणणं आहे की, पक्षाची खरी विचारधारा, संघटनात्मक रचना आणि जनमानसातील प्रतिमा त्यांनी जपली आहे. त्यामुळे मूळ चिन्हावर त्यांचा हक्क आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट झाल्यावर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना वेगळं चिन्ह दिलं होतं, मग शिवसेनेच्या बाबतीत तसंच का केलं नाही? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
राज्यातील मुंबई (Mumbai), पुणे (Pune), नागपूर (Nagpur) यासह २७ महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या असून, प्रचाराला वेग आला आहे. चिन्हाबाबतचा अंतिम निर्णय जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करू शकतो, यामुळे ठाकरे गटाने अंतरिम आदेश मागितला आहे.
राज आणि उद्धव ठाकरेंचा संयुक्त रॅलीचा निर्णय
दरम्यान, ५ जुलैला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईत ‘मराठी विजय दिवस’ (Marathi Vijay Diwas) रॅली एकत्र घेणार आहेत. या रॅलीत कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जो ठाकरे कुटुंबातील एकतेचा संदेश देतो.