Kerala Mother Killed New Born : केरळ (Kerala) राज्यातील एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे, ज्यात एका अविवाहित महिलेने स्वतःच्या दोन नवजात बाळांचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. या महिलेचे नाव अनिशा (Anisha) असून तिच्या २५ वर्षीय प्रियकराचे नाव बाविन (Bavin) आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून, या गुन्ह्याचे प्रकरण तब्बल ३-४ वर्षांनी उघड झाले आहे.
पोलिस ठाण्यात सांगाड्यांसह हजर
बाविन (Bavin) शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास पुडुक्कड (Pudukkad) पोलिस ठाण्यात पोहोचला. दारूच्या नशेत असलेल्या बाविनकडे एक पिशवी होती. त्यामध्ये त्याने दोन नवजात बाळांचे सांगाडे असल्याचा दावा केला. यामुळे पोलिसही हादरले. चौकशीअंती ही खळबळजनक माहिती उघड झाली.
पोलिसांनी लगेचच अनिशा (Anisha) हिला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत तिने काही माहिती नाकारली, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच तिने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली.
पहिल्या बाळाचा खून
अनिशा आणि बाविन २०२० साली फेसबुक (Facebook) द्वारे एकमेकांच्या संपर्कात आले. लवकरच दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. अनिशा गर्भवती राहिली, परंतु तिने हे प्रकरण कुटुंबापासून लपवून ठेवले.
पहिल्या बाळाचा जन्म २०२२ मध्ये झाला. सुरुवातीला तिने पोलिसांना सांगितले की बाळाच्या गळ्यात नाळ अडकली होती आणि त्यामुळे त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. मात्र, नंतर तिने कबूल केले की जन्मानंतर लगेचच तिने बाळाचा गळा आवळून खून केला आणि घराजवळील मोकळ्या जागेत बाळाला पुरले.
या घटनेनंतर अनिशा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली. तिला वाईट स्वप्न पडू लागली. आठ महिन्यांनंतर तिने बाळाचे अवशेष पुन्हा बाहेर काढले आणि ते बाविन (Bavin) ला दिले. त्याने एक तांत्रिक विधी केल्यानंतर सांगाडा पुन्हा दुसऱ्या ठिकाणी दफन केला.
दुसऱ्या बाळाची हत्या
अनिशा पुन्हा गर्भवती राहिली. २०२४ मध्ये दुसऱ्या बाळाचा जन्म झाला. परंतु यावेळीही तिने रडणाऱ्या नवजात बाळाचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह पुन्हा बाविनकडे दिला. दोन्ही बाळांचे सांगाडे फॉरेन्सिक तपासणीत नवजात अर्भकांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही काळानंतर अनिशा आणि बाविनमध्ये मतभेद निर्माण झाले. अनिशा दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करू इच्छिते, असा संशय बाविनला होता. त्याचबरोबर, अनिशाजवळ दुसरा मोबाईल सापडल्यामुळे बाविन अधिक चिडला.
या भांडणानंतर बदला घेण्याच्या उद्देशाने त्याने दोन बाळांचे सांगाडे घेऊन पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि सगळं उघड केलं. त्यामुळे हा अनेक वर्षांपासून दडवलेला गुन्हा बाहेर आला. पोलिसांनी सांगितले की, हे दोन्ही गुन्हे अत्यंत क्रूर असून आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा (Murder Case) दाखल करण्यात आला आहे. तपास अधिक सखोल केला जात आहे. मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही दोघांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.