Agriculture News Latur : लातूर जिल्ह्यातील (Latur district) हाडोळती (Hadolti) या गावात राहणाऱ्या ६५ वर्षीय अंबादास गोविंद पवार (Ambadas Govind Pawar) या शेतकऱ्याच्या हालअपेष्टांचे हृदय पिळवटून टाकणारे वास्तव समोर आलं आहे. शेतमालाला दर न मिळणं, बियाणं-खतांचे वाढते दर आणि मजुरीचा खर्च परवडत नसल्याने त्यांनी शेतीची मशागत स्वतःच्या जीवावर करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
शेतीसाठी बैल किंवा ट्रॅक्टर न परवडल्याने स्वतःला औताला जुंपलं
अंबादास पवार (Ambadas Pawar) यांच्याकडे अडीच एकर कोरडवाहू जमीन आहे. अनेक वर्षांपासून ते पेरणीपूर्व मशागतीसाठी कोणतीही यंत्रं किंवा बैल न वापरता स्वतःच औताला जुंपून नांगरणी करत आहेत. त्यांच्या पत्नी, वय ६०, या देखील त्यांना या कामात मदत करतात. वर्षानुवर्षे कष्ट करूनही नशिबात फक्त त्रास आणि अपुरी आर्थिक मदतच येते, असं ते सांगतात.
बैल किंवा ट्रॅक्टर नांगरणीचा खर्च परवडत नाही
एका दिवसासाठी बैलाने नांगरणी करायची तर सुमारे अडीच हजार रुपये मोजावे लागतात, तर ट्रॅक्टर वापरल्यास याहूनही जास्त खर्च येतो. हा खर्च न परवडल्याने अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नीने बैलाऐवजी स्वतःच औत ओढण्याचा निर्णय घेतला. हे दृश्य पाहून कोणाचेही मन हेलावून जाईल.
कुटुंबाची जबाबदारी आणि मुलांचे भवितव्य टिकवण्यासाठी संघर्ष
पवार दाम्पत्याला एक मुलगी आहे, तिचे लग्न झाले आहे. मुलगा पुण्यात (Pune) छोट्या-मोठ्या कामांवर गुजराण करतो. त्याची पत्नी आणि दोन लहान मुले गावात राहतात. त्यांचा शिक्षणाचा खर्च, घरखर्च सांभाळण्यासाठी अंबादास पवार आजही वयाच्या या टप्प्यावर राब राब राबत आहेत.
शेतमालाला हमीभाव न मिळणं, बियाणे आणि खतांचे वाढते दर, मजुरीचा तुटवडा, यामुळे अंबादास पवार यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. पावसाचा लहरीपणा आणि सरकारकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ प्रत्यक्षात पोहोचत नसल्याने कृषीप्रधान देशात आजही अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतं.
एकीकडे सरकार “शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या” (Doubling Farmers’ Income) गप्पा मारतं, आधुनिक शेतीचा गजर करते. पण दुसरीकडे अंबादास पवार यांच्यासारख्या शेतकऱ्याला स्वतःला औताला जुंपावं लागतं. हे चित्र कृषीप्रधान देशासाठी (Agrarian Nation) निश्चितच काळजीचं कारण आहे.