Sanjay Raut : महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीबाबत चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या टिपीकल शैलीत प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांच्यावर तिखट शब्दांत निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना “मुक्त विद्यापीठ” असे संबोधले. त्यांनी म्हटले की, “राज ठाकरे हे एक मुक्त विद्यापीठ आहेत. कोणीही तिथे जाऊन पदवी घेऊ शकतो. तिथे खिचडी मिळते, पदवीही मिळते.” तसेच पुढे बोलताना त्यांनी टोला हाणला की, “जर राज ठाकरे त्या मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे.”
त्याचबरोबर, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीबाबत विचारले असता, राऊत म्हणाले की, “राज ठाकरेंनी आम्हाला एक प्रस्ताव दिला होता, त्याला आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र आमची एकच अट आहे – जे महाराष्ट्राच्या हिताविरोधात भूमिका घेतात, त्यांच्याशी कोणतेही अनैतिक संबंध ठेवले जाऊ नयेत.”
नारायण राणे आणि राज ठाकरे यांचे कौतुक
संजय राऊत यांनी आपल्या विधानात नारायण राणे आणि राज ठाकरे यांचे विशेष उल्लेख करत त्यांचे कौतुकही केले. “नारायण राणे यांनी पक्ष सोडला, स्वतःचा पक्ष स्थापन केला, पण त्यांनी कधीही ‘मीच खरा शिवसेनाप्रमुख’ असा दावा केला नाही. त्यांना पक्ष चालवायला जमले नाही म्हणून दुसऱ्या पक्षात गेले आणि राजकारण सुरू ठेवले. राज ठाकरेंनीही स्वतःचा पक्ष काढून स्वतंत्र राजकारण केले.”
अजित पवारांवर थेट प्रहार
अजित पवार आणि शरद पवार यांच्या नात्याविषयी विचारले असता, राऊत म्हणाले, “अजित पवार यांनी अमित शहांच्या मदतीने शरद पवारांचा पक्ष पळवला. एकनाथ शिंदेप्रमाणे त्यांनी कधीही ‘मीच खरा’ अशी भूमिका घेतली नाही. मात्र अजित पवारांचा दावा की त्यांनी राष्ट्रवादीला जन्म दिला – हे हास्यास्पद आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक व्यासपीठावर असताना अजित पवार असे म्हणत असतील, तर ते रेम्या डोक्याचे आहेत.”
सध्या महाराष्ट्रातील राजकारणात सत्तेच्या समीकरणांमध्ये बदलाची चिन्हे दिसत असून, विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटी, प्रस्ताव आणि प्रतिक्रियांनी वातावरण चांगलेच तापले आहे. संजय राऊत यांच्या या विधानांमुळे ठाकरे-राज ठाकरे युतीच्या चर्चांमध्ये आणखी रंग भरला आहे, तसेच अजित पवारांविषयीच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या भविष्यातील समीकरणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
sanjay-raut-calls-raj-thackeray-an-open-university






