Balochistan : बलुचिस्तानमधील अस्थिरतेला आणखी एक धक्का बसला आहे. बलूच लिबरेशन आर्मी (BLA) या बंडखोर संघटनेने पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्यावर जोरदार हल्ला केला असून, या हल्ल्यात 7 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 24 तासांत BLA कडून झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे.
बोलानमध्ये रचला स्फोटाचा कट
हा हल्ला बलुचिस्तानच्या बोलान जिल्ह्यातील माछकुंड परिसरात झाला. BLA च्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने पाक सैन्याच्या वाहनावर रिमोट-नियंत्रित स्फोटकांद्वारे हल्ला केला. पाकिस्तानी सैन्य एका ऑपरेशन्ससाठी तयारी करत असतानाच हा हल्ला झाला, ज्यामुळे त्यांना मोठा फटका बसला.
अगोदरच केचमध्ये झालेला होता हल्ला
याआधी BLA ने केच जिल्ह्यातील किलाग भागात देखील पाक सैन्याला लक्ष्य करत हल्ला केला होता. त्या हल्ल्यातही अनेक सैनिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सततच्या या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या लष्करी यंत्रणेची चिंता वाढली आहे.
बलुचिस्तानवर पकड सैल – शाहिद खाकान अब्बासी
बलुचिस्तानमधील स्थितीवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी स्पष्ट शब्दांत कबुली दिली होती की, “बलुचिस्तान एका बेलगाम घोड्यासारखा झाला आहे. रात्र झाली की तो अधिक बेफाम होतो.” त्यांचे हे विधान बलुचिस्तानमधील अस्थैर्य अधोरेखित करते.
BLA ची मागणी – स्वतंत्र बलुचिस्तान
BLA ही संघटना पाकिस्तानपासून स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढा देत आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक वेळा पाक लष्करावर हल्ले चढवले आहेत. पाकिस्तान सरकार शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करत असल्याचा दावा करते, मात्र वाढत्या हल्ल्यांमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र दिसते.
a-pakistani-army-vehicle-in-balochistan-was-blown-up-remotely