Dr. Shirish Valsangkar : सोलापूर शहरात खळबळ उडवणाऱ्या प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर प्रकरणात रोज नवी वळणं घेतली जात आहेत. एकीकडे आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यात असतानाच, दुसरीकडे त्यांच्या सुनेचा आणि तिच्या वडिलांचा अचानक गायब होणं संशयास्पद ठरत आहे.
सून डॉ. सोनाली आणि वडील डॉ. दिलीप जोशी बेपत्ता
गेल्या दोन दिवसांपासून डॉ. वळसंगकर(Dr. Shirish Valsangkar) यांची सून डॉ. सोनाली आणि तिचे वडील डॉ. दिलीप जोशी हे दोघे सोलापूरमधून गायब आहेत. त्यांच्या परदेश गमनाची शक्यता चर्चेत असून, काहींनी दावा केला की ते अमेरिकेला गेले आहेत. मात्र, यासंदर्भात पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. काही कर्मचारी सांगत आहेत की ते मुंबईत स्थायिक होणार आहेत, तर काहींच्या म्हणण्यानुसार सोनाली ३० मे नंतर पुन्हा ओपीडी सुरू करणार आहे.
प्रकरणातील गुन्हे आणि तपास
डॉ. शिरीष वळसंगकर(Dr. Shirish Valsangkar) आत्महत्येनंतर हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे-माने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला अटकही झाली आहे. वळसंगकर कुटुंबातील सदस्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले असून, आत्महत्येपूर्वी सापडलेल्या चिठ्ठीवरून तपास सुरू आहे.
घटनाक्रम: आत्महत्येच्या रात्रीचं थरारनाट्य
१८ एप्रिलच्या रात्री डॉ. वळसंगकर नेहमीप्रमाणे रुग्ण तपासून घरी परतले. रात्री ८.३० वाजता त्यांच्या बेडरूमच्या बाथरूममधून गोळीबाराचा आवाज ऐकू आला. दुसऱ्यांदा गोळी झाडल्यावर कुटुंबीयांनी धाव घेतली असता ते रक्ताच्या थारोळ्यात सापडले. त्यांना तातडीने त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मुलगा डॉ. अश्विन, सून डॉ. सोनाली आणि इतर तज्ज्ञांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्री १०.२० वाजता मृत घोषित करण्यात आले.
डॉ. शिरीष वळसंगकर: एक प्रतिष्ठित वैद्यकीय कारकीर्द
डॉ. वळसंगकर हे सोलापुरातील सुप्रसिद्ध न्युरोफिजिशियन होते. त्यांनी लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून एमआरसीपी (यूके) पदवी प्राप्त केली होती. त्यांचं ‘एस.पी. इंस्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस’ हे हॉस्पिटल महाराष्ट्र-कर्नाटक-तेलंगणा सीमावर्ती भागात अत्याधुनिक न्यूरोलॉजी सेवेसाठी प्रसिद्ध होतं. वैद्यकीय सेवेसोबतच वैमानिक म्हणूनही त्यांनी स्वतःचं खासगी विमान खरेदी करून मार्गदर्शन केलं होतं.
सध्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मात्र कुटुंबातील सदस्यांचे हालचाल आणि परदेश गमन यामुळे प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
new-twist-in-dr-shirish-valsangkar-case-daughter-in-law-dr-sonali-missing-with-father