Sanjay Raut : जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला बारा दिवस उलटले असले, तरी केंद्र सरकारने अजून कोणताही ठोस बदला घेतलेला नाही, अशी तीव्र टीका शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केली आहे. या हल्ल्यात देशाचे 27 जवान शहीद झाले. मात्र, सरकारकडून केवळ पाकिस्तानचे युट्युब चॅनल्स बंद करणे, दूतावासातील कर्मचारी कपात करणे आणि एअर स्पेस बंद करणे या स्वरूपात प्रतिक्रियाच मिळाल्या असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
“दहशतवाद्यांवर कारवाई नाही, फक्त राजकीय विरोधकांवर सूड”
संजय राऊत म्हणाले, “सरकार आपल्या राजकीय विरोधकांचा सूड घेण्यात माहीर आहे. विरोधकांचे पक्ष फोडले जातात, त्यांना तुरुंगात डांबले जाते, त्यांच्या कुटुंबीयांचा छळ केला जातो. मात्र, जेव्हा शत्रू पाकिस्तानकडून हल्ला होतो, तेव्हा सरकार शांत का राहते? याला बदला म्हणता येईल का?”
“पाकिस्तानी यूट्यूब चॅनल बंद करणे आणि स्टाफ कपात करणे म्हणजे फक्त दिखावा आहे. इंदिरा गांधी यांनी कसा बदला घेतला होता, ते पाहा. आज सरकारकडे ती इच्छाशक्तीच दिसत नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
‘लाडकी बहीण’ योजनेवरही राऊतांचा हल्लाबोल
‘लाडकी बहीण’ योजनेसंदर्भातही राऊतांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. “प्रचारात 2100 रुपये देण्याचे आश्वासन होते, प्रत्यक्षात मात्र 1500 वरून रक्कम 500 रुपयांवर आली आहे. योजना बंदच झाल्यासारखी आहे,” असे ते म्हणाले.
“मंत्र्यांचा ‘माझा पैसा’ असा हट्ट हास्यास्पद”
“सामाजिक न्याय खात्याचा निधी ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी वळवण्यात आल्यावर काही मंत्री म्हणत आहेत, ‘माझा पैसा वळवला’. हा पैसा खरोखर तुमचा आहे का, की जनतेचा? निवडणूक जिंकण्यासाठी खिशातला नव्हे तर शासकीय पैसा वापरण्यात आला आहे. ही सरळसरळ जनतेची फसवणूक आहे,” असा आरोप राऊतांनी केला.
“अजित पवार हे अर्थमंत्री म्हणून अपयशी”
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, “अजितदादा एक अर्थमंत्री म्हणून खामक्या (कमकुवत) माणूस आहेत. त्यांनी मतांसाठी खिसा उघडला, मात्र आता त्यातून निघणं त्यांना कठीण जातंय. ‘लाडकी बहीण’ योजना ही निवडणूकपूर्व पाकीटमारी होती.”
bjp-should-look-at-the-history-of-indira-gandhi-sanjay-raut