Dr. Shirish Valsangkar : सोलापूरचे सुप्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर(Dr. Shirish Valsangkar) यांनी 18 एप्रिल रोजी रात्री आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं. ही धक्कादायक घटना रात्री 8.30 च्या सुमारास घडली. त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने त्यांना एस.पी. न्युरो हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान रात्री 10.20 वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि सोलापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
डॉ. वळसंगकर(Dr. Shirish Valsangkar) हे केवळ सोलापूरच नव्हे, तर राज्यभरात आणि परदेशातही आपल्या वैद्यकीय सेवेबद्दल ओळखले जात होते. त्यांनी स्थापन केलेल्या SP Institute of Neurosciences या रुग्णालयात देशभरातून रुग्ण उपचारासाठी येत असत.
घटनेच्या रात्रीचा घटनाक्रम असा होता की, रुग्णांची तपासणी करून घरी परतल्यानंतर त्यांनी बेडरूममधील बाथरूममध्ये स्वतःवर गोळी झाडली. दोन वेळा गोळीबार झाल्याचा आवाज ऐकून कुटुंबीय बेडरूममध्ये धावले, तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात सापडले. पोलिसांनी घटनेनंतर बेडरूम सील करून फॉरेन्सिक तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, डॉ. वळसंगकर यांची आर्थिक स्थिती आणि गुंतवणूक यासंदर्भातील माहिती समोर येत आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, त्यांनी गेल्या 15 वर्षांत म्युच्युअल फंडांमध्ये सुमारे 160 कोटी रुपये SIP च्या माध्यमातून गुंतवले होते. गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, ही रक्कम वाढून सुमारे 300 कोटींपर्यंत पोहोचू शकते.
महत्त्वाचं म्हणजे, या गुंतवणुकीचा लाभ कोणाला मिळणार, याविषयी अजूनही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. डॉ. वळसंगकर यांनी नॉमिनी म्हणून कोणाचे नाव दिले आहे, याविषयी उत्सुकता आहे. संबंधित कागदपत्रांची छाननी झाल्यानंतरच वारसाला ही रक्कम मिळू शकेल.
कोण होते डॉ. शिरीष वळसंगकर?
69 वर्षीय डॉ. वळसंगकर(Dr. Shirish Valsangkar) यांनी सोलापुरातील दयानंद महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर, डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेजमधून MBBS आणि MD पदवी मिळवली. पुढे लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून MRCP (UK) पदवी प्राप्त केली. त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलपासून वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. न्यूरोलॉजीमध्ये त्यांचा मोठा अभ्यास असून, देशविदेशात त्यांनी संशोधननिबंध सादर केले आहेत. वैद्यकीय क्षेत्राव्यतिरिक्त त्यांना विमानवहनाची विशेष आवड होती. त्यांनी स्वतःचे विमान खरेदी केले होते आणि अनेक शिकाऊ वैमानिकांना मार्गदर्शनही केले होते.
पोलिस तपास सुरू; मनीषा मुसळे माने यांची चौकशी
या प्रकरणात मनीषा मुसळे माने या महिलेची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, कुटुंबीयांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. सध्या पोलिस तपासाचा फोकस आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर आणि डॉ. वळसंगकर यांच्या आर्थिक व्यवहारांवर आहे.
ही घटना केवळ एक वैयक्तिक दु:खद शेवट नसून, उच्च शिक्षित आणि प्रतिष्ठित व्यक्तीने अशा प्रकारचं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं, यावर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
dr-shirish-valsangkar-had-invested-a-whopping-rs-160-crore-in-mutual-funds