Pahalgam attack : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम भागात घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज (28 एप्रिल) आठवडा पूर्ण झाला आहे. हल्ल्याच्या तपासात आता महत्त्वाचे धागेदोरे मिळू लागले असून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) तपासाला अधिक गती मिळाली आहे.
एनआयएने घटनास्थळी डिजिटल मॅपिंग केलं असून, तिथून मिळालेले नमुने न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. बैसरन व्हॅलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हॉटेल्स आणि बाजारपेठांमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, त्याची बारकाईने तपासणी सुरू आहे.
हल्ल्याच्या दिवशी सॅटेलाइट फोनचा वापर
तपासात उघड झालं आहे की, हल्ल्याच्या दिवशी बैसरन व्हॅली भागात चीनमध्ये बनवलेले सॅटेलाइट फोन सक्रिय होते. हे फोन तस्करी करून भारतात आणले गेले होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. घटनास्थळावरून रिकाम्या झालेल्या काडतूसांचा तपासही सुरू आहे, ज्यातून गुन्ह्यात वापरलेल्या शस्त्रांचा प्रकार समोर येण्याची शक्यता आहे.
तसेच, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पर्यटकांचे मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केल्याचे तपासात समोर आले आहे. त्या दिवसाचा संपूर्ण मोबाइल डंप डेटा गोळा करण्यात आला असून, त्यावरूनही तपास सुरू आहे. याशिवाय जखमी प्रत्यक्षदर्शींना NIA कडून जबाब नोंदवण्यात येत आहेत.
नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याचे प्रत्युत्तर
दरम्यान, 27-28 एप्रिलच्या रात्री कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यांच्या सीमेवर, पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी विनाकारण लहान शस्त्रांद्वारे गोळीबार सुरू केला. भारतीय सैन्याने याला त्वरित आणि प्रभावी प्रत्युत्तर दिले, अशी माहिती अधिकृत निवेदनात देण्यात आली आहे.
पाकिस्तानचा निष्पक्ष चौकशीचा दावा
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पहलगाम हल्ल्याच्या निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीसाठी पाकिस्तान तयार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानने दहशतवादाचा नेहमी निषेध केला आहे आणि स्वतःही त्याचा बळी ठरला आहे. मात्र, त्यांनी भारतावर कोणतेही ठोस पुरावे न देता निराधार आरोप केल्याचा आरोपही केला. डॉन डॉट कॉमच्या वृत्तानुसार, काकुल येथील पाकिस्तान मिलिटरी अकादमीत आयोजित परेड दरम्यान शाहबाज शरीफ यांनी हे वक्तव्य केलं.
nia-in-action-mode-to-investigate-pahalgam-attack