Devendra Fadnavis : राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही; सगळ्यांना बाहेर घालवायची व्यवस्था केलीय – फडणवीस

Devendra Fadnavis : भारत सरकारच्या आदेशानुसार, आज (२७ एप्रिल) पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचा अंतिम दिवस आहे. भारताने सर्व प्रकारच्या पाकिस्तानी व्हिसा रद्द केले असून, फक्त वैद्यकीय व्हिसा २९ एप्रिलपर्यंत वैध राहणार आहेत. व्यवसाय, शिक्षण, पर्यटन, पत्रकारिता, स्थलांतर किंवा तीर्थयात्रेसाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील स्थिती
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या माहितीनुसार, राज्यातील ४८ शहरांत एकूण ५०२३ पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत. नागपूरमध्ये सर्वाधिक २४५८, तर ठाण्यात ११०६ आणि मुंबईत १४ पाकिस्तानी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी फक्त ५१ जणांकडे वैध कागदपत्रे असून, १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचे प्राथमिक अहवालात नमूद झाले होते.

मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राज्यातील सर्व पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत व कोणतीही व्यक्ती हरवलेली नाही. “सर्वांना बाहेर काढण्यासाठी व्यवस्था केली असून, आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सर्वजण भारत सोडतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

काश्मीरमध्ये मोठी कारवाई
पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे. दहशतवाद्यांचे घर उद्ध्वस्त करण्यात आले असून, ४०० हून अधिक संशयितांना अटक करण्यात आली आहे. एनआयएने दाखल केलेल्या एफआयआरवर तपास सुरू असून जम्मू-काश्मीर पोलिसांसह इतर तपास यंत्रणा सहकार्य करत आहेत.

जागतिक पाठिंबा भारताला
पहलगाम हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मोठा पाठिंबा मिळत आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन यांनी भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेचा समर्थन केला आहे. विशेषतः मुस्लीम देशांमधून इराण आणि युएईने उघडपणे भारताला पाठिंबा दिला असून, त्यांच्या राष्ट्रप्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधून हल्ल्याचा निषेध केला आहे.
devendra-fadnavis-no-pakistani-citizen-will-remain-in-the-state