Jalgaon : हळदीच्या कार्यक्रमात निवृत्त PSI बापाने लेकीवर आणि जावयावर केला गोळीबार; मुलीचा मृत्यू, जावई गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या मुलीवर संतापलेल्या वडिलांनी एका लग्नसमारंभात गोळीबार करून तिचा जागीच खून केला, तर जावई गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपी वडिलाला चोप दिला असून, तोही जखमी आहे.

मृत महिला तृप्ती अविनाश वाघ (वय २४) हिने अविनाश ईश्वर वाघ (वय २८, मूळ रा. करवंद, शिरपूर; सध्या पुणे) याच्याशी दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र तिचे वडील किरण अर्जुन मंगले (वय ४८, रा. शिरपूर, निवृत्त सीआरपीएफ जवान) या विवाहाने नाराज होते.

शनिवारी रात्री, चोपड्यातील डॉ. आंबेडकर नगर भागात अविनाशच्या बहिणीच्या हळदीसमारंभासाठी तृप्ती व अविनाश आले होते. समारंभ सुरू असतानाच आरोपी वडीलांनी अचानक त्या ठिकाणी येऊन तृप्तीवर रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली. तृप्तीचा जागीच मृत्यू झाला. तिला वाचवण्यासाठी पुढे धावलेल्या अविनाशवरही गोळी झाडण्यात आली, ज्यात तो गंभीर जखमी झाला.

हल्ल्यानंतर संतप्त जमावाने आरोपी वडिलाला पकडून मारहाण केली. या प्रकरणात वडीलही गंभीर जखमी झाले आहेत. अविनाशला तातडीने जळगावला उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेही यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. संपूर्ण शहरात या प्रकारामुळे हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
an-outrageous-incident-in-chopda-town-of-jalgaon-district