Share

Dinanath Mangeshkar Hospital : वर्षाला नाममात्र १ रुपये भाड्याने जमीन, मग्रूर मंगेशकर रुग्णालयाला खैरात का, राज्य सरकारच्या निर्णयाने वाद!

Dinanath Mangeshkar Hospital : पुणे शहरातील प्रतिष्ठित मानलं जाणारं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Deenanath Mangeshkar Hospital) सध्या चांगलंच वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. तनिषा भिसे (Tanisha Bhise) या गर्भवती महिलेचा केवळ पैशांच्या अटीमुळे उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भाजप आमदार अमित गोरखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तनिषा यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आलं तेव्हा रुग्णालय प्रशासनाने थेट 20 लाख रुपयांची मागणी केली. कुटुंबीय *अडीच लाख रुपये तत्काळ भरायला तयार होते, तरीही रुग्णालयाने उपचार सुरू न करता त्यांना नाकारलं. परिणामी, तनिषाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला, पण वाटेतच त्यांनी *जुळ्या बाळांना जन्म दिला आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधूनही त्यांनी कोणतीही मदत करण्यास नकार दिला.

दुसरीकडे, रुग्णालयाला ‘नाममात्र’ दराने जमीन देण्यात आली होती!

या दुर्दैवी घटनेनंतर आणखी एक महत्वाची आणि वादग्रस्त बाब उघड झाली आहे. 18 फेब्रुवारी 2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुण्यातील मौजे कर्वेनगर येथील 795 चौ. मीटर जागा फक्त 1 रुपया वार्षिक भाडे या नाममात्र दरात पूल बांधण्यासाठी दिली गेली होती. ही जमीन दीनानाथ मंगेशकर फाउंडेशन हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरला हस्तांतरित करण्यात आली होती.

या निर्णयामुळे आता सरकारवर आणि रुग्णालय प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप

सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या प्रकरणावर सडकून टीका केली आहे. त्यांनी म्हटलं, “सरकारने दीनानाथ रुग्णालयाला हजारो चौरस फूट जागा अगदी नाममात्र दरात दिली. त्याच रुग्णालयाने एका गरजू गर्भवती महिलेवर फक्त 10 लाख आगाऊ न दिल्यामुळे उपचार नाकारले. ही दुहेरी नीती संतापजनक आहे.”

त्यांनी असेही सांगितले की, “या जमिनीची बाजारभावानुसार किंमत किमान 10 कोटी रुपये आहे, जी रुग्णालयाला फक्त 1 रुपयात दिली गेली. हे म्हणजे सार्वजनिक संसाधनांचा विशिष्ट संस्थांसाठी वापर आणि सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ.”

‘मग्रूर रुग्णालयाला खैरात का?’ – संतप्त जनतेचा सवाल

रुग्णालयाच्या या वागणुकीवरून संतप्त नागरिक विचारत आहेत – “गरिब रुग्णांकडून लाखो रुपये मागणाऱ्या मग्रूर रुग्णालयाला सरकारने खैरात का दिली?”

या प्रकरणामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची सामाजिक जबाबदारी आणि नैतिकतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता हे रुग्णालय या गंभीर आरोपांवर स्पष्टीकरण देणार का, असा सवाल सर्वत्र केला जात आहे.

राजकीय आणि सामाजिक पातळीवर मोठा दबाव

या प्रकरणाने राजकीय वर्तुळातही खळबळ माजवली असून, आमदार अमित गोरखेंनी याबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारने मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा पुन्हा आढावा घेऊन चौकशी करण्याची मागणीही जोर धरते आहे.

“आरोग्यसेवा ही हक्काची आहे, केवळ पैशांच्या आधारावर मिळणारी सुविधा नाही,” हा संदेश या घटनेतून जनतेने सरकार आणि खासगी रुग्णालयांना स्पष्टपणे दिला आहे.

क्राईम आरोग्य ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now