Disha Salian : दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. दिशाच्या लॅपटॉपमध्ये तिच्या वडील सतीश सालियन यांच्या व्हॉट्सअॅप डेटा आढळल्याची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान, आधीच्या एसआयटीला हा डेटा मिळाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दिशाला तिच्या वडिलांचे एका महिलेशी संबंध असल्याचा संशय होता. वडिलांना याची कल्पनाही नव्हती की दिशा त्यांच्या व्हॉट्सअॅप संदेशांवर लक्ष ठेवत आहे. विशेष म्हणजे, 2 जून 2020 रोजी दिशाने तिच्या वडिलांना एका महिलेला 3,000 रुपये पाठवण्याबद्दल जाब विचारला होता.
त्यानंतर 4 जून रोजी दिशाने घर सोडल्याची नोंद आहे. मालाड मालवणी येथे गेल्याची माहिती तिने मित्रांना दिली होती, आणि तिच्या मित्रांनी पोलिस चौकशीतही हे स्पष्ट केले आहे. प्रकरणाचे मूळ काय? दिशा सालियनने आत्महत्या केली की तिची हत्या झाली, याचा शोध घेत असताना पहिल्या एसआयटीच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, दिशाला तिच्या वडिलांचे एका अनोळखी महिलेशी बोलण्याचे संशय होते. त्यानंतर तिने वडिलांच्या नकळत त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटचा ऍक्सेस घेतला होता. त्या माध्यमातून तिला समजले की वडिलांनी एका महिलेला 3,000 रुपये पाठवले होते. या प्रकारामुळे दिशाला धक्का बसला होता. 2 जून 2020 रोजी तिने वडिलांना याबाबत विचारणा केली आणि दोघांमध्ये वाद झाला. याच वादानंतर, 4 जून रोजी दिशाने घर सोडले होते.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी दिशाच्या मित्रांची चौकशी केली होती. त्यांनी दिलेल्या जबाबातही या घटनेचा उल्लेख होता. दिशाच्या वडिलांचा जबाब घेताना त्यांनी स्पष्ट केले की, त्या महिलेशी त्यांचे कोणतेही अनैतिक संबंध नव्हते. ती त्याच्या दिवंगत मित्राची पत्नी होती, जी आर्थिक अडचणीत सापडली होती.
त्यामुळे तिला मदत म्हणून पैसे पाठवले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे सर्व मानवतेच्या नात्याने करण्यात आले होते आणि यात कोणताही गैरउद्देश नव्हता. मात्र, दिशाच्या लॅपटॉपमधील डेटा आणि तिच्या वडिलांशी झालेल्या वादामुळे ती मानसिक तणावात होती, असे एसआयटीने आपल्या तपासात नमूद केले होते.
हायकोर्टात सुनावणीची तयारी दिशा सालियान प्रकरणी आता मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करत याचिका दाखल केली आहे. त्यांनी या याचिकेत आदित्य ठाकरे आणि दिनो मौर्या यांच्यावर आरोप करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर दिशाभूल केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
याशिवाय, सालियन कुटुंबावर दबाव टाकला गेला असल्याचा आरोप करत त्यांनी तपास मुंबईच्या बाहेर करण्याची मागणी केली आहे. तसेच, शवविच्छेदनाचे चित्रीकरण आणि संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे, त्यांचा बॉडीगार्ड, सुरज पांचोली, दिनू मौर्या आणि मुंबई पोलिसांचे मोबाईल टॉवर लोकेशन शोधले जावे, अशीही मागणी केली आहे. तसेच, दिशाचा फोन आणि लॅपटॉप तिच्या प्रियकराकडून कुटुंबाकडे परत द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
ही प्रकरण आता पुन्हा चर्चेत आले असून, हायकोर्टाच्या पुढील निर्णयाकडे संपूर्ण लक्ष लागले आहे.