Raj Thackeray : शिंदे गटाच्या सरवणकरांचा राज ठाकरेंवर हल्ला, सेना भवनासमोर लावला भलामोठ्ठा बॅनर, म्हणाले, गंगाजल….

Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघात मनसेचे अमित ठाकरे पराभूत झाले होते. त्यांच्या पराभवात शिंदे गटाचे नेते समाधान सरवणकर यांचा मोठा वाटा होता. आता त्यांच्या मुलाने राज ठाकरे यांना डिवचणारा फलक लावून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

शिवसेना भवनासमोर लावला मोठा फलक

शिवसेना भवनासमोर समाधान सरवणकर यांनी एक मोठा फलक लावला असून, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसैनिकांच्या कुंभमेळ्यातील छायाचित्रांसह एक रोखठोक मजकूर लिहिला आहे.

“गंगाजल शुद्धच आहे, पण काहींच्या विचारांचं काय?”

या फलकावर कुंभमेळ्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले आहे. “144 वर्षांनी आलेल्या महाकुंभ सोहळ्यात जगभरातील 60 कोटींहून अधिक हिंदू सहभागी झाले. त्यांनी त्रिवेणी संगमात स्नान करून हिंदू संस्कृतीच्या भव्यतेचा संदेश दिला. हा क्षण अभिमानाचा आणि हिंदूंच्या एकजुटीचा होता,” असे फलकावर लिहिले आहे.

राज ठाकरेंच्या विधानावरून प्रतिक्रिया

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील गंगा नदीच्या पाण्यावर टीका करत ते प्रदूषित असल्याचे म्हटले होते.
“बाळा नांदगावकर कुंभमेळ्यातून माझ्यासाठी गंगाजल घेऊन आले होते, पण मी ते प्यायलो नाही. कोट्यवधी लोक कुंभमेळ्यात जातात, त्यांच्या विष्ठेमुळे नदी प्रदूषित होते. मग ते पाणी शुद्ध कसं असू शकतं?” असा सवाल त्यांनी केला होता.

शिंदे गटाचा ‘हिंदुत्व’ कार्ड

राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर शिंदे गटाने आता हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला असून, फलकबाजी करत त्यांना लक्ष्य केले आहे.
हा फलक राज ठाकरे यांच्या घराजवळच लावण्यात आल्याने मनसे काय उत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे हे दादरमध्ये प्रभावी मानले जातात. त्यामुळे शिंदे गटाच्या या कुरघोडीला ते कसे प्रत्युत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.