Pune : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कान्हे गावात एका २२ वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी संध्याकाळी ७:४५ वाजता शनि मंदिराजवळ ही घटना घडल्याचे समोर आले असून, या घटनेने संपूर्ण मावळ तालुका हादरला आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत वैभव आणि आरोपी अंकुश हे शेजारी राहणारे होते. अंकुशला वैभवचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून रागाच्या भरात अंकुशने वैभवच्या मानेवर कोयत्याने वार केला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पुढील तपास सुरू आहे.
मावळ तालुक्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख
ही हत्या घडल्यामुळे संपूर्ण मावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र स्पष्ट होत असून, अशा घटनांवर आळा घालणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
कळंबमध्ये महिलेची हत्या, दोन आरोपी अटकेत
दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी करण्यात आलेल्या एका महिलेची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी दोन जणांना अटक केली असून, या हत्येचा देशमुख हत्या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
धाराशिव पोलिसांच्या माहितीनुसार, कळंब शहरातील द्वारकानगरी भागात शुक्रवारी एक कुजलेला मृतदेह आढळून आला. तपासादरम्यान, माहितीनुसार आरोपी राण्या उर्फ रामेश्वर भोसले (वय ३२) आणि उस्मान सय्यद (वय २९, रा. केज, जि. बीड) यांना येरमाळा-कळंब मार्गावर अटक करण्यात आली. दोघांनी हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली आहे.
या दोन्ही घटनांमुळे पुणे आणि बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस तपास सुरू आहे.