Kolhapur : कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या शवागृहात वापरलेला बर्फ गटारात टाकल्यानंतर तो पुन्हा धुऊन थंडपेयांसाठी वापरण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ ‘साम टीव्ही’च्या हाती लागला असून, त्यात हे धक्कादायक वास्तव स्पष्टपणे दिसून येते.
शवागृहातील बर्फ थंडपेय विक्रेत्यांकडे कसा पोहोचला?
गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयाजवळील थंडपेय विक्रेत्यांकडे असलेल्या बर्फाबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली होती. काही सतर्क नागरिकांनी या विक्रेत्यांचा मागोवा घेतल्यावर धक्कादायक सत्य समोर आले. शवागृहात मृतदेह थंड ठेवण्यासाठी वापरण्यात येणारा बर्फ वापरानंतर गटारात टाकला जात होता. मात्र, काही विक्रेते हा बर्फ पुन्हा गटारातून काढून स्वच्छ पाण्याने धुऊन वापरत होते.
नारळपाणी, लस्सी आणि मठ्ठ्यात वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार
या बर्फाचा नारळपाणी, लस्सी, मठ्ठा आणि इतर थंडपेय विक्रीसाठी सर्रासपणे वापर केला जात होता. साम टीव्हीच्या हाती लागलेल्या व्हिडिओमध्ये काही विक्रेते गटारातील बर्फ उचलून, धुऊन पाणी थंड करण्यासाठी वापरत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हा प्रकार उघड होताच नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी एका विक्रेत्याला रंगेहाथ पकडून चोप दिला.
महापालिका प्रशासनाची कारवाई, दुकाने तात्काळ बंद
या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने घटनास्थळी पाहणी केली आणि संबंधित विक्रेत्यांची दुकाने तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शहरात या घटनेमुळे खळबळ उडाली असून, नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
हा प्रकार उजेडात आल्यानंतर महापालिकेने कठोर कारवाईचे संकेत दिले असून, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी नागरिकांनीही जागरूक राहावे, अशी विनंती करण्यात आली आहे. शहरातील सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक ठरणाऱ्या *या प्रकारावर कठोर पावले उचलली जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.