मागील वर्षी अति विषारी मण्यार सापाशी खेळण्याच्या नादात सागर महाजन आणि राहुल समर्थ या दोन युवकांना आपला जीव गमवावा लागला होता. आता असाच आणखी एक धक्कादायक प्रकार घडला असून, सापांबद्दलच्या अज्ञानाने एका सर्प मित्राला आपला जीव गमवावा लागला आहे.
संबंधित घटना ही वर्ध्याच्या सानेवाडीतील आहे. येथील बबलू काकडे नावाच्या सर्प मित्राने गुरुवारी सायंकाळी सात वाजता प्रवीण भोंगाडे नामक व्यक्तीच्या घर परिसरातून या मण्यार सापाला पकडले होते. पण तो हा साप बिनविषारी धामण असल्याची बतावणी करत सापाला घेऊन परिसरात फिरत होता.
तो सापाला घेऊन फिरत असताना काहींनी त्याचे व्हिडीओ देखील काढले. हा बिनविषारी धामण जातीचा साप असल्याचं बबलू या व्हिडीओतून लोकांना सांगत होता. साडेतीन फुटाचा हा साप हाताळताना बबलूला तो दंश ही करायचा, पण बबुल त्याला काहीच होत नाही असे लोकांना सांगत फिरायचा.
मात्र, गुरुवारी रात्री आठ वाजता बबलूला अचानक उलट्या व्हायला सुरुवात झाल्या. त्यानंतर, परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ कांबळे यांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. बबलूवर त्वरित उपचार व्हावेत म्हणून धडपड केली.
मात्र, गुरुवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास बबलुची प्राणज्योत मावळली. त्यानंतर तपासात समोर आलं की, ज्या सापाला तो धामण समजत होता. तो एक विषारी मण्यार साप होता. या सर्प मित्राचा सापाच्या अज्ञानाने मृत्यू झाला. परिसरात या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली.
सध्या या तरुणाचा सापाशी खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यात तरुण त्या सापाशी खेळ खेळताना दिसत आहे. सर्प मित्राने साप आणि धामण यांच्यातील फरक ओळखण्यात चूक केल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला आहे.