Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 किलो सोनं अन् 40 किलो चांदी लुटली, बड्या बिझनेसमनच्या घरातूनच..

Chhatrapati Sambhajinagar : वाळूज एमआयडीसी परिसरात एकाच आठवड्यात दोन भीषण दरोडे घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेत बजाजनगर येथील प्रसिद्ध उद्योजक संतोष राधाकिशन लड्डा यांच्या निवासस्थानी मोठा दरोडा टाकून कोट्यवधींचा ऐवज लंपास करण्यात आला. दुसऱ्या घटनेत, अंतापूर शिवारातील एका शेतवस्तीवर मध्यरात्री दरोडेखोरांनी महिलांना लक्ष्य करत सोन्याचे दागिने आणि रोकड चोरली. या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये आणि उद्योजक वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

बजाजनगरमध्ये उद्योजकाच्या घरावर मोठा दरोडा

8 किलो सोनं, 40 किलो चांदी चोरीला
संतोष लड्डा यांचा मुलगा अमेरिकेत शिक्षण घेत असून, त्याला भेटण्यासाठी संपूर्ण कुटुंब आठवडाभरापूर्वी परदेशात गेले होते. लड्डा कुटुंब परदेशात असल्याची माहिती मिळताच सहा दरोडेखोरांनी त्यांच्या निवासस्थानी हल्ला चढवला. घरातील ड्रायव्हर आणि केअरटेकरच्या हातपाय बांधून, बंदुकीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी संपूर्ण घरातील मौल्यवान दागिन्यांची लूट केली.

प्राथमिक माहितीनुसार, सुमारे 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी चोरून नेण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिस ठाण्याचे अधिकारी, श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, त्यावरून आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

शेतवस्तीवर थरार: महिलांवर हल्ला, 3 तोळे सोनं आणि रोकड चोरीला

अंतापूर शिवारात शेतकऱ्याच्या घरावर दरोडा
दुसरी धक्कादायक घटना अंतापूर शिवारातील शेतकरी योगेश रामराव इंगळे यांच्या घरात घडली. रविवारी (दि. 11) मध्यरात्री सहा दरोडेखोरांनी तलवार, कोयते, सुरे घेऊन घरात प्रवेश केला. चेहऱ्यावर रूमाल बांधलेले हे चोरटे घरातील सदस्यांना धमकावत एका खोलीत बंद करत तब्बल एक तास थरार माजवत होते.

या दरम्यान, महिलांच्या कानातील कुंडे कैचीने कापून, टॉप्स आणि अन्य सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. बेडरूममधील कपाटे उघडून एकूण 1 लाख 18 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक, ठसे तज्ज्ञांची मदत घेऊन पुरावे गोळा केले. योगेश इंगळे यांच्या तक्रारीवरून सहा अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस तपास सुरू, स्थानिकांमध्ये अस्वस्थता

या दोन्ही घटनांमुळे वाळूज एमआयडीसी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून उद्योजकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. पोलिसांनी दोन्ही घटनांचा तपास गतीने सुरू केला असून, लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी परिसरातील नागरिक आणि उद्योजकांना सीसीटीव्ही कॅमेरे सक्रिय ठेवण्याचे आणि सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्याचे आवाहन केले आहे.
8-kg-gold-and-40-kg-silver-found-in-chhatrapati-sambhajinagar