तिरुपती मंदिरातील पुजाऱ्यांनबरोबर ७४३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; तिघांचा मृत्यू

नवी दिल्ली | दिवसेंदिवस भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज ५० हजारापेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. अशातच अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तिरुमला तिरूपती देवस्थान असलेल्या मंदिरातील (टीटीडी) ७४३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, मंदिराशी संबंधित ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, ४०२ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली असून, ते यातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर ३३८ जणांवर सध्या वेगवेगळ्या कोरोना केंद्रात उपचार सुरु आहेत. तिरुपती देवस्थानाचे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सिंघल यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे.

लॉकडाऊननंतर ८ जून रोजी पहिल्यांदाच तिरुमला तिरुपती देवस्थान उघडण्यात आले होते. भक्तांच्या मागणीनुसार मंदिर सुरु करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतल्याचे, यावेळी सिंघल यांनी सांगितले.

मात्र हे मंदिर उघडण्यात आले असले तरी कोरोना संसर्गामुळे विशेष नियमावली बनवण्यात आली आहे. या नियमांचे पालन करुनच भक्तांना तिरुपतीचे दर्शन घेता येत आहे.

मंदिर सुरू झाल्यानंतर आठवड्याभरातच म्हणजेच १६ जून रोजी मंदिरातील १४ पुजाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. पुजाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांची एक बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत पुजाऱ्यांना आरोग्यविषयक सूचना देण्यात आल्या.

या मंदिरात एकुण ५० पुजारी आहेत. मंदिर सुरू झाल्यानंतर त्यातील १४ पुजाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली, त्यावेळी यासंदर्भातील माहिती तिरुपती देवस्थानाचे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सिंघल यांनी दिली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.