“५६ आमदार असलेले मुख्यमंत्री होतात, मग ११९ वाले राज्यसभेत का जाणार नाहीत?”

मुंबई । काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राजीव सातव यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर राज्यसभेत त्यांची जागा रिक्त झाली आहे. रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी चार ऑक्टोबरला मतदान होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे.

आज संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते. ही जागा आम्हीच जिंकणार असा दावा भाजपने केला आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, राजकारणात काहीही होऊ शकते. ५६ आमदार असलेले मुख्यमंत्री होतात, तर मग ११९ वालेही राज्यसभेत जाऊ शकतात, असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. यामुळे आता या निवडणुकीत काय होणार हे लवकरच समजेल.

ते म्हणाले, ५४ वाले उपमुख्यमंत्री होतात. ४४ वाले महसूलमंत्री बनतात. आमचे १०६ आणि १३ अपक्ष आमदार म्हणजे ११९ आमदार होतात. मग ११९ वालेही राज्यसभेत जाऊ शकतात. उपाध्याय राज्यसभेत जाणारच. अजून अपक्ष मिळाले तर १२७ किंवा १२८ चा आकडाही आम्ही गाठू शकतो, असेही पाटील यांनी सांगितले.

संजय उपाध्याय भाजपचे मुंबई सरचिटणीस आहेत. तसेच उत्तर भारतीयांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांच्या वडिलांनी अयोध्येच्या राममंदिराचे भूमिपूजन केले आहे. त्यामुळे ते राज्यसभेवर निवडून जाणे आमच्यासाठी भूषावह आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

संजय उपाध्याय यांच्यामुळे नक्कीच उत्तर प्रदेशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला फायदा होईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. यामुळे आता चुरस निर्माण झाली आहे. लवकरच याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.